नाशिक : प्रेम प्रकरणातून झालेला वाद आणि नंतर अंगावर पेट्रोल टाकून काडी पेटविताना झालेल्या झटापटीत गंभीररीत्या भाजलेल्या महिला जळीत प्रकरणातील मुख्य संशयित रामेश्वर ऊर्फ बाळा भागवतची न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणात बाटलीत पेट्रोल विकणाऱ्या पंपातील व्यवस्थापक, कर्मचाऱ्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंबंधीची कागदपत्रे पंपावरून ताब्यात घेण्याचे काम सुरू असल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लासलगाव बसस्थानक परिसरात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली होती. प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जखमी महिलेने दिलेल्या जबाबानुसार मुख्य संशयित रामेश्वर ऊर्फ बाळा भागवत याच्याशी गेल्या महिन्यात लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी संशयिताचा साखरपुडा झाल्याने उभयतांमध्ये खटले उडाले. लासलगाव बस स्थानकासमोर असाच वाद होऊन दुचाकीत टाकण्यासाठी बाटलीत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून दोघांनी आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पेटविलेली काडी महिलेच्या अंगावर पडल्याने ती भाजली.

आसपासच्या नागरिकांनी धाव घेऊन तिला विझविले. यावेळी संशयित भागवतबरोबर दत्तू जाधव आणि नीलेश कंडाळे हे दोघे जण होते. पोलिसांनी जाधव, कंडाळेला ताब्यात घेतले. पण, भागवत फरार झाला होता. त्याला येवला तालुक्यात अटक करण्यात आली. दरम्यानच्या काळात संशयिताने समाज माध्यमावर व्हिडीओ प्रसारित करत महिलेने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. महिलेचा जवाब, प्रत्यक्षदर्शी, संशयिताचे म्हणणे या सर्वाची पडताळणी केली जात आहे.

मुख्य संशयित रामेश्वर ऊर्फ बाळा भागवतला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती लासलगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, बाटलीत पेट्रोल विकण्यास प्रतिबंध आहे. असे असताना लासलगाव येथे महिलेला बाटलीत पेट्रोलची विक्री झाली होती. याप्रकरणी पंप व्यवस्थापक, कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. या संबंधीची कागदपत्रे ताब्यात घेण्याचे काम सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमी महिलेवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth arrested for setting woman on fire get police custody zws
First published on: 18-02-2020 at 02:09 IST