१४ मार्च १९८८ ते १४ मार्च २०१८.. चक्क ३० वर्ष पूर्ण होतील मला या वर्षी मुंबईत येऊन! त्यापूर्वी औरंगाबादमध्ये सातत्यानं सहा-सात वर्षे ‘जिगीषा’ संस्थेत नाटक करतच होतो. त्याआधी कॉलेजमध्ये. आणि खरं तर त्याही आधी शाळेमध्येच पहिल्यांदा चेहऱ्याला रंग लागला होता! म्हणजे हिशेब मांडायला बसलं तर लक्षात येतं, की जवळजवळ ३७ वर्ष मी या ‘नाटका’च्या प्रांगणात रमून गेलोय. जगण्याच्या प्रवाहात खरं तर कुठे वेगळीकडे जाण्याचं ठरत असतानाच वळणावळणांवर काही अवलिया मित्र भेटले, काही अभूतपूर्व चमत्कार वाटावा अशा जिवंत क्षणांची प्रचीती आली आणि मग मात्र इथंच रुजत गेलो.. तो आजतागायत. आता मागे वळून या प्रवासाकडे पाहिलं तर ते जणू एखादं ‘मेलोड्रॅमॅटिक’ नाटकच वाटतं! रचित, पक्क्या आकृतिबंधात बांधलेलं, गतिमान कथानकाचं, भरपूर संघर्ष असलेलं, योगायोगांनी, भावनाप्रधान क्षणांनी खच्चून भरलेलं नाटक! (विरोधाभास म्हणजे हाच ‘मेलोड्रामा’ माझ्यातल्या दिग्दर्शकाला नाटकात मात्र आलेला चालत नाही.)

..लहानपणी आईनं काहीतरी काम सांगावं, पुन्हा पुन्हा नीट निरोप देऊन ‘ते काम करून ये हं’ असं बजावावं आणि आपण मात्र रस्त्यातच ‘गारुडय़ाचा खेळ’ बघत उभं राहावं, त्यातच रममाण व्हावं.. कशाला, कुठे चाललो होतो तेच विसरून जावं.. असं काहीसं चमत्कारिक स्वरूप आहे या माझ्या नाटकाकडे ओढला जाण्याचं. मधल्या सळसळत्या ३७ वर्षांमध्ये फरक एवढाच झालाय, की जो गारुडय़ाचा खेळ बघायला तेव्हा मी थबकलो होतो, तोच मी आता त्या गोलाच्या आत उभा आहे. रोज एक नवा खेळ मांडतोय. तो बघायला माणसं येताहेत. त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर जे कुतूहल होतं, ते आज समोरच्या पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे. जी धडधड तेव्हा माझ्या छातीत होती ती आता त्यांच्या शरीरात आहे. आता ते ‘पाहणारे’ झाले आहेत आणि मी ‘करणारा’! ‘तुम्हाला साप आणि मुंगुसाची लढाई पाहायला मिळणार! खिशात हात घालू नका, नीट पाहा, लक्ष केंद्रित करा,’ असं सांगून तो बोलघेवडा गारुडी वेगवेगळ्या छोटय़ा जादूचे प्रयोग करीत राहायचा. ज्या साप-मुंगुसाची लढाई पाहायला लोक जमलेले असत त्यांची उत्सुकता ताण ताण ताणायचा; आणि शेवटपर्यंत ती लढाई मात्र दाखवायचाच नाही! फरक हाच आहे, की मला मात्र त्याच्यासारखे आज हात झटकता येत नाहीत. तसे छोटे छोटे हातचलाखीचे प्रयोग करण्यापेक्षा सुजाण प्रेक्षकाला ‘नाटक’ नावाचंच ‘गारुड’ दाखवण्याची माझ्यावर जबाबदारी आहे.

या खेळाच्या ‘प्रभावा’ची, ‘शक्ती’ची मला एव्हाना पूर्ण कल्पना आलीय. त्याचं ‘सामर्थ्य’ही आतून कळलंय. पण या खेळाचा वापर केवळ काही क्षणांची मजा वाटण्यापेक्षा तो सादर करताना करणाऱ्यांना आणि पाहणाऱ्यांना दर वेळी नवा अनुभव मिळाला पाहिजे, हे वाटणं दृढ होत चाललंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा खेळ उत्सुकतेनं बघायला आलेल्यांच्या बुद्धीवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते केवळ इथं करमणूक करवून घ्यायला आलेले नाहीयेत, तर जाणीवपूर्वक स्वत:वर अंधार करवून घेऊन ते मेंदू-मनासह दोन तास एका ‘बौद्धिक’ अशा विलक्षण कलाप्रकारात सामील, समरस व्हायला आले आहेत याविषयी मला शंका नाही. ते सर्कस किंवा एखाद्या खेळाचा थरारक सामना पाहायला आलेले नाहीयेत, चमत्कारांनी भारावून जाणारे नाहीयेत; तर हा दोन तासांचा ‘कलाप्रकार’ पाहिल्यानंतर नाटय़गृहाबाहेर पडताना आपण ‘बदललेले’ असतो, यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. त्यासाठी ते वेळ, पसा, अग्रक्रम देऊन येतात. आमचा एकमेकांवर अतीव विश्वास आहे. मी त्यांचा अनुनय करावा अशी त्यांची माझ्याकडून अपेक्षा नाही. आणि म्हणूनच मलाही या बुद्धिमान प्रेक्षकांची फसवणूक करण्याची मुभा नाही.

इतरांसारखंच शाळेमध्ये नाटकात काम करू लागलो. पण त्यापूर्वीच माझ्या वागण्या-जगण्यात मोठा बदल झाला तो ‘वक्तृत्व स्पर्धे’मुळे. तिसरी-चौथीत असतानाच शिक्षकांनीच लिहून दिलेलं छोटंसं भाषण करायला मला शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर उभं केलं तेव्हा कमी उंचीमुळे मी मागच्या मुलांना नीट दिसतही नव्हतो. तत्परतेनं शिक्षकांनी मला सरळ शेजारच्या टेबलावरच उभं केलं आणि म्हणाले, ‘आता बोल.’ तेव्हा तिथून मला खाली दिसणारे सगळे आणि क्षणभर ‘काय बोलू?’ ही अंगावर चालून आलेली ‘भीती’ ही बहुधा शेवटचीच! उलट, याच क्षणानं मला विलक्षण असं सामर्थ्य दिलं असावं. कारण इथून पुढे सगळे गंड हळूहळू गळून पडले, मी बोलका होत गेलो, आत्मविश्वास गवसत गेला.

खरं तर घर, आजूबाजूचा परिसर, खडतर आर्थिक परिस्थिती यादृष्टीनं पुढं जाऊन कलाक्षेत्रातच पूर्णवेळ काम करावं अशी कोणतीही पाश्र्वभूमी नव्हती. पटापटा शिक्षण पूर्ण करून उत्तम अशी पर्मनंट नोकरी मिळणं, घरची आर्थिक परिस्थिती सुधारणं हाच सगळ्यांचा ‘फोकस’ होता. त्यात आई-वडील, नातेवाईक, हितचिंतक, शिक्षक सगळेच होते. आणि त्यांचा तो विचार रास्तच होता. कारण खेडय़ातून शहरात येताना मुलांचं शिक्षण आणि त्यांनी मार्गी लागणं हाच पालकांचा उद्देश होता. पण मी मात्र अभ्यासात मनानं कधी गुंतलोच नाही. अगदीच ‘ढ’ नाही आणि ‘मेरिट’ थोडं दूरच अशा मधल्या गटात मागे-पुढे होत राहिलो. आयुष्याचं ‘वळण’ बदलणाऱ्या दहावी आणि बारावी या महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यांवरही मी पूर्ण जोमानं अभ्यासात उडी मारलीच नाही. पण नेमकं याच काळात वक्तृत्व, नाटक ही आवड मात्र वाढत होती. आणि मी हळूहळू सांस्कृतिक वर्तुळाच्या दिशेनं सरकायला लागलो होतो.

दहावीच्या परीक्षेत मला आणखी सात-आठ टक्के गुण जरी जास्त मिळाले असते तरी पुढे पॉलिटेक्निक किंवा अजून काही करून एव्हाना माझ्या पक्क्या नोकरीची ३०-३२ वर्षे पूर्ण झाली असती आणि मी गॅ्रच्युइटी, पेन्शनच्या आकडय़ांचं कोष्टक बनवत बसलो असतो. पण म्हणजे तेव्हा मी मुद्दामच जास्त अभ्यास केला नव्हता का? या प्रश्नाचं उत्तर आज बऱ्याच अंशानं होकारार्थी येतं. पुढे बारावीलाही हीच पुनरावृत्ती! दहावीनंतर बरोबरीचे मित्र शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात विज्ञान शाखेला गेले. मीही त्यांच्या मागोमाग तिथंच. (मित्र सगळे मेरिटवालेच होते आणि त्यांचा इंजिनीयरिंगचा निश्चय पक्का होता, हे विशेष.) पण खरी गोम अशी होती, की याच महाविद्यालयाचे वक्तृत्व, वादविवाद स्पर्धाचे ‘स्पेशालिस्ट’ असलेले प्रा. वसंत कुंभोजकर सर शाळेतच मला भेटले होते. त्यांनी पाठीवर हात ठेवून ‘तू लवकर आमच्याच कॉलेजला ये,’ असा संकेतही दिला होता. कॉलेजच्या अक्षरश: पहिल्या दिवसापासून (५ सप्टेंबर १९७८) मी वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेला जी सुरुवात केली, ती पुढे सलग पाच वर्षे मी महाराष्ट्रातल्या सगळ्या नावाजलेल्या, महत्त्वाच्या स्पर्धामध्ये लागोपाठ सहभागी होतच राहिलो. त्या काळात नाटकांमध्ये मिळालेल्या पारितोषिकांपेक्षा वादविवाद स्पर्धेतील बक्षिसांची संख्या जास्त होती.

बरोबरीचे मित्र ठरल्याप्रमाणे बारावीनंतर इंजिनीयिरग, मेडिकलला निघून गेले. मी मात्र या कॉलेजच्या गुलमोहराच्या झाडाखाली रमलो तो रमलोच! नवे मित्र, नव्या संकल्पना आणि याच दरम्यान अत्यंत वेगानं ‘नाटक’ आयुष्यात घुसत गेलं. बी. एस्सी. केलं, पण उपस्थिती प्रयोगशाळेपेक्षा ‘नाटकशाळे’तच जास्त! शाळेत नाटकाचा पाया भरला तो अचलेरकर सर, सराफ सरांनी. कॉलेजमध्ये नंदू माधव या सीनियर मित्रानं नाटकाची आवड लावली. तर पुढे नाटक करण्याची खरी शिस्त लावली ती प्रशांत दळवी या सहप्रवासी मित्रानं. १९८०-८१ ला प्रशांत जो भेटला तो आजच्या क्षणापर्यंत ‘फ्रेंड-फिलॉसॉफर-गाइड’ याच भूमिकेत माझ्यासोबत आहे. एकूणच औरंगाबादमधली जिगीषाची जडणघडणीची वर्ष, मुंबईत स्थलांतर केल्यानंतरचा काळ या प्रवासाकडे पाहिलं तर शिक्षण + हौस, शिक्षण + नाटकाची पॅशन, नोकरी + नाटकाचाच ध्यास, स्थलांतर आणि १९९० नंतर नोकरी सोडून पूर्णवेळ कलाक्षेत्रातच दिग्दर्शक म्हणून वावर असा माझ्या आयुष्याचा सतत बदलता आलेख दिसतो.

सुरुवातीला मुंबईत माझ्या नोकरीसाठी प्रयत्न केले ते प्रदीप भिडे यांनी, तर ‘नोकरी सोड आणि पूर्णवेळ या क्षेत्रात काम कर..’ असा पाठपुरावा केला तो ज्येष्ठ मित्र विनय आपटेनं. १९९० ते १९९९ हे पूर्ण दशक भयंकर वेगवान होतं. प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, हिंदी-गुजराती रंगमंचावरचं नाटक अशी ‘मॅरेथॉन’च या दशकात अनुभवता आली. पुढे रीतसर, नैसर्गिकरीत्या माध्यमांतरही होत गेलं- मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी, हिंदी चित्रपट, डॉक्युमेंटरीज्, अ‍ॅड फिल्मस्, इव्हेंट्स..! पण या माध्यमांतरानंतरही मी पुन:पुन्हा नाटकाकडे वळतच राहिलो. ‘संहिता ते प्रयोग’ हे अत्यंत अवघड बाळंतपण पुन्हा पुन्हा आवेगानं अनुभवत राहिलो.. दर वेळी प्रत्येक नाटककार देत गेला माणसाच्या जगण्याकडे पाहण्याची दृष्टी.. तंत्रज्ञ, सहकलाकारांबरोबर सतत होत राहिली वैचारिक ‘घुसळण’.. दर वेळी भर पडत गेली ‘आकलना’मध्ये.. वाढतच राहिली रंगमंचावरचं हे आभासी ‘वास्तव’ समजावून घेण्याची ‘ऊर्मी’! एकूणच ‘दिग्दर्शक’ हे पद मिरवून घेण्यासाठी नाही, तर ती एक सर्जनशील जबाबदारी आहे, हे मनावर कायम ठसत गेलं. अभ्यास, निरीक्षण आणि प्रत्यक्ष ‘नाटक’ नावाचा डोलारा उभा करताना कशी दमछाक होते हे आतून कळत गेलं. दर वेळी नाटक सादर होण्याचा तो ‘जादूई’ क्षण अनुभवायची आतुरता वाढतच गेली. तो समग्र अनुभव घ्यायचा, त्याची तृप्ती अनुभवायची आणि मग पुन्हा सुरू नवा प्रवास, नवा टप्पा. आज मागे वळून पाहिलं तर स्वच्छ, स्पष्ट दिसतंय, की दिवसाचे २४ तास, आठवडय़ाचे सात दिवस आणि वर्षांचे ३६५ दिवस मी या नाटकाच्या ‘जादूमयी नगरीत’च दंग झालोय.. मिसळून गेलोय नाटकाच्या इंद्रधनुषी रंगांमध्ये.. या अफाट आवेगानं मला कायम वेगवान जगणं दिलं, ऊर्जा दिली. तीही स्थितीज नव्हे, तर गतिज.. Kinetic Energy!

गंमत अशी की, आनंदाचा असो की दु:खाचा- माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षणांशी कुठल्या ना कुठल्या तरी नाटकाच्या तालमीची, स्पर्धेची, प्रयोगाचीच आठवण जोडलेली आहे. ‘‘हा हा, तेव्हा ना मी ‘अमक्या’ नाटकाच्या तालमी करत होतो!’’, ‘‘नाही नाही, हे शक्यच नाही. कारण मला स्पष्ट आठवतं, की त्यावेळी माझ्या त्या ‘तमक्या’ नाटकाचा प्रयोग होता..’’ अशीच वाक्यं बोलताना सहजपणे येत राहतात. कारण आयुष्याचं एक अजब २४  ७ असं ‘कॅलेंडर’च तयार केलंय ‘नाटक’ या गोष्टीनं!

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी नाटक वाचतोय, तालमी करतोय, चर्चा करतोय, तंत्रज्ञांशी बोलतोय. प्रत्येक नटाबरोबर वेगवेगळ्या भूमिका जगतोय. लेखकांकडून बारीक बारीक तपशिलांचा उलगडा करून घेतोय. निर्मात्याबरोबर नियोजन करतोय. वेगवेगळ्या नाटकांचा आशय समजून घेतोय. त्या- त्या शैलीनुसार दर वेळी नाटक वेगळं सादर करण्याचा प्रयत्न करतोय.. नाटकाच्या तालमींमधल्या झपाटून जाण्याची ओढ वाढतच चाललीय. ते- ते नाटक सुरू असताना मेंदूत पूर्णवेळ नाटकच फिरत राहतं, सारखं दिसत राहतं. मागून-पुढून, वरून-खालून. मला इतरांची नाटकं बघण्याचीही तेवढीच तीव्र इच्छा असते. एका वेगळ्या संवेदनेनं, जाणिवेनं दुसरेही कुणी याच रंगावकाशात काय आणि कसं शोधू पाहताहेत, याचं लहान मुलासारखं मला सतत कुतूहल वाटतं. दिवस-रात्र याच माहौलमध्ये राहण्याची ही ओढच बहुधा नाटकवाल्यांना गतिशील ठेवत असावी. स्वत:भोवती फिरत राहून आणखी एका दुसऱ्या गोष्टीभोवतीही फिरण्याची ही ‘लय’ गवसायला वेळ लागतो खरा; पण एकदा का त्या ‘अवकाशयाना’त तुम्ही बसलात, की मग तुम्ही कलेच्या कक्षेत कायम फिरतच राहता. असं जगायला मिळणं खूप भन्नाट आहे. तुमची हौस, आवड, अग्रक्रम, अर्थार्जन, कामाचा आनंद, सर्जनाची अनुभूती, जगण्याचं भान येणं.. असं धो-धो जगणं आपण आपल्या ‘टम्र्स अ‍ॅण्ड कंडिशन्स’वर जगू शकतो, यापेक्षा आणखी कोणता मोठा आनंद?

ज्या ‘नाटक’ नावाच्या गोष्टीनं जगणंच बदलून गेलं, ज्यानं एक व्यापक अनुभवविश्व दिलं, त्या नाटकाविषयी इथं या सदरात लिहीन म्हणतोय. इतर माध्यमांतल्या कामाविषयी लिहीनच, पण ‘फोकस’ मात्र नाटकावरच असेल. माझं घडणं, माझ्या नाटकांविषयी लिहिता लिहिता त्या काळातला ‘भवताल’ पकडण्याचाही प्रयत्न करेन, महत्त्वाची निरीक्षणं नोंदवेन. आशय, आकृतिबंधाचे टप्पे, वेगवेगळे नाटय़प्रवाह, काही ठोस बदल, या प्रवासातली अत्यंत महत्त्वाची माणसं, माझे समकालीन या सगळ्यांविषयी इथं काही मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन म्हणतोय. ही जाणीवपूर्वक मागे वळून पाहण्याची संधी ‘लोकसत्ता’नं मला दिलीय. खरं तर मी सतत ‘बोलणारा’; पण

थोडं थांबून, एकाग्र होऊन ‘लिहिण्या’चा हा अनुभव काही वेगळं देऊन जाईल असं वाटतंय. बघू या, हा प्रवास कोणत्या रस्त्यानं होतोय, कसा होतोय!

चंद्रकांत कुलकर्णी

chandukul@gmail.com