News Flash

‘जिगीषा’.. एक जुनून!

नाटकाची गोडी लागली होतीच, पण ते करण्यामागचा नेमका फोकस ठरत नव्हता, दिशा निश्चित नव्हती..

..आणि ‘जिगीषा’चं वर्तुळ विस्तारत गेलं. 

नाटकाची गोडी लागली होतीच, पण ते करण्यामागचा नेमका फोकस ठरत नव्हता, दिशा निश्चित नव्हती.. आणि या महत्त्वाच्या वळणावर एक मित्र भेटला. तो म्हणजे प्रशांत दळवी. समाजवादी विचारसरणीचे त्याचे वडील बाबा दळवी हे पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीतलं एक मान्यवर व्यक्तिमत्त्व; तर नाटय़क्षेत्रात कार्यरत असलेला मोठा भाऊ अजित हा ‘युक्रांद’ची पाश्र्वभूमी असलेला.. राज्यशास्त्राचा प्राध्यापक. वहिनी अनुया हिंदीच्या प्राध्यापिका. घरी सतत चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा राबता.. अशा अत्यंत जाणीवसंपन्न कुटुंबात प्रशांत वाढला होता. शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा, गॅदरिंगचं नाटक करतानाच त्याच्याशी घट्ट  मत्र जुळत गेलं. (गंमत म्हणजे पुढे जाऊन ‘चारचौघी’ ते ‘चाहूल’ आणि ‘ध्यानीमनी’ ते ‘गेट वेल सून’ अशी गंभीर, इंटेन्स नाटकं लिहिणारा प्रशांत तेव्हा मात्र रंगमंचावर फार्सिकल, विनोदी भूमिका अफलातून करायचा!) कथालेखन करणारा प्रशांत तोवर एकांकिका लिहू लागला होता. चाळीसगावच्या स्पध्रेत त्यानं लिहिलेली ‘भुयार’ ही एकांकिका करायचं ठरलं. फॉर्म भरताना त्यानं ‘दिग्दर्शक’ या रकान्यात माझं नाव लिहिलं आणि त्याक्षणी मी आयुष्यभरासाठीचा ‘दिग्दर्शक’ झालो. स्पध्रेचे पक्के आडाखे असलेली ‘तद्दन’ एकांकिका होती ती. साहजिकच सगळी बक्षिसं आम्हाला मिळाली. आम्ही दोघांनी त्यात कामंही केली. मी होतो चक्क एक करोडपती उद्योजक, तर प्रशांत होता मानसशास्त्रज्ञ! माझं तर अत्यंत ‘इनोदी’ असं ‘कास्टिंग’ होतं. इतका किरकोळ, कुपोषित करोडपती त्यानंतर प्रेक्षकांनी कधीच पाहिला नसेल!

एकांकिका पाहून अजितदादानं (दळवी) थेट प्रश्न विचारला, ‘‘यात तुमची संवेदना, तुमचं अनुभवविश्व कुठंय?’’ आणि आमचे डोळे खाडकन् उघडले. यानंतर युवक महोत्सवात लेखक-दिग्दर्शक म्हणून आम्ही सादर केली एकांकिका- ‘गल्ली’! ज्यात प्रशांतला लेखनाचा सच्चा सूर गवसला. आणि नंतर मीही कधी ‘मिसकास्टिंग’ केलं नाही! असे वेळीच सावध झालो नसतो तर आम्ही स्पध्रेच्या साचेबद्ध परीघातच फिरत राहिलो असतो आणि नाटय़जाणिवेच्या प्रवासाला आरंभच झाला नसता.

तेव्हा औरंगाबादेत ‘नाटय़रंग’, ‘दिशांतर’, ‘पारिजात’, ‘दलित थिएटर्स’, ‘नांदीकार’, ‘परिवर्तन’ अशा प्रस्थापित संस्थांचा दबदबा होता. १९८० साली ‘नाटय़रंग’चं ‘स्मारक’ हे नाटक मुंबईला राज्य नाटय़स्पध्रेच्या अंतिम फेरीत पहिलं आलं आणि महाराष्ट्राच्या नजरेत औरंगाबादविषयी कुतूहल जागं झालं! त्याआधीच आदरणीय प्रा. कमलाकर सोनटक्के सरांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या विद्यापीठातील नाटय़शास्त्र विभागामुळे परिसरातल्या नाटय़जाणिवा प्रगल्भ होत होत्या. आणि डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या ‘वऱ्हाड..’नं राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलं होतं. प्रा. त्र्यंबक महाजन, डॉ. दिलीप घारे, यशवंत देशमुख, श्रीकांत कुलकर्णी या सीनियर मंडळींची नाटकं पाहत पाहत आमची रंगभाषा प्रगल्भ होत होती. ‘नाटय़रंग’च्या ‘आघात’, ‘आकाशपक्षी’ इत्यादी नाटकांमधला कुमार देशमुख, जयश्री गोडसे, शशिकांत पटवर्धन, चंद्रकांत शिरोळे, चंदू सोमण, ए. पी. कुलकर्णी यांचा अप्रतिम अभिनय आजही लख्ख आठवतो. कमलताई भालेराव, डॉ. आलोक चौधरी यांच्या फार्सिकल भूमिका आणि विश्वास सोळुंकेंचा लोकनाटय़ातला अभिनय तर फर्मास! मधू गायकवाड, जयंत फडके, विजया शिरोळे, अनुराधा वैद्य, जयंत दिवाण, विजय दिवाण, वसंत दातार, माधुरी दातार, सीमा मोघे या मंडळींचा अभिनय विशेष अनुभव देणारा असे. ‘थांबा, रामराज्य येतंय’, ‘म्युलॅटो’, ‘रूद्रवर्षां’, ‘एवम् इंद्रजित’, ‘मेलो मेलो ड्रामा’, ‘मुक्तिधाम’, ‘लढा’ या नाटकांनीही समज वाढवली.

यापकी कोणत्याही संस्थेत आम्ही सहजच सामील होऊ शकलो असतो. पण आमच्यापेक्षा वयानं दोन-तीन वर्षांनीच मोठा असणाऱ्या प्रशांतच्या डोक्यात मात्र तेव्हा वेगळ्याच नाटकाचा ‘प्लॉट’ आकार घेत असावा. नाटकाची ‘पॅशन’ असणाऱ्या समवयीन आणि समविचारी मित्रमत्रिणींची तो जुळवाजुळव करत होता. आपल्याच अनुभवांशी संबंधित आपण लिहावं, आपल्यापकीच कुणीतरी ते दिग्दर्शित करावं, शिवाय नट, तंत्रज्ञ, व्यवस्थापन अशी यंत्रणा निर्माण करण्याची ‘लाँग टर्म’ आखणी तो करत होता. जणू एक ‘मास्टर ग्रुप’ निर्माण करण्याचा ‘मास्टर प्लॅन’च! वरवर अंतर्मुख, मितभाषी, शांत वाटणारा प्रशांत प्रसंगी अत्यंत खंबीर, कणखर भूमिका घेतो हाही अनुभव येत गेला. गॅदिरगमध्ये रमायचं नाही, एकांकिकेत अडकायचं नाही, साचलेपण यायच्या आत स्पर्धामधूनही चटकन् बाहेर पडायचं.. असे महत्त्वाचे निर्णय त्यानं संस्थाप्रमुख म्हणून वेळीच घेतले. हे सांस्कृतिक नेतृत्व करताना त्यानं सतत लोकशाही तत्त्व वापरलं. कधीही स्वत:कडे श्रेय घेतलं नाही. ‘टीमवर्क’ कल्चर रुजवलं. एकजुटीचं ‘स्पिरीट’ निर्माण केलं. म्हणूनच ‘जिगीषा’ असं एकच नाव घेतलं तरीही त्यातल्या ५० जणांना आपलंच नाव उच्चारल्यासारखं वाटतं. समान विचार, शिस्त, विस्तारित कुटुंब ही त्रिसूत्री तो जाणीवपूर्वक वापरत होता. यात सुरुवातीला बरोबर असणारे अनेक जण पुढे पूर्णवेळ कलाक्षेत्रात सामीलही होऊ शकले नाहीत. आज ते महाराष्ट्रात वकील, संपादक, आयटी, संशोधन, बँकिंग, प्रशासकीय सेवा अशा क्षेत्रांत उच्चपदस्थ आहेत. पण ‘जिगीषा’शी त्यांचे भावबंध आजही कायम आहेत. कारण इथं आम्ही जे एकत्र शिकलो ते शिक्षण कदाचित कुठल्याही मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमध्ये मिळालं नसतं!

दरम्यान, प्रा. अनघा संजीव यांनी ‘महिला दिनानिमित्त नाटकाच्या रूपात काही सादर कराल का?’ असं विचारलं आणि ‘स्त्री’ या नाटिकेची निर्मिती झाली. १३ मार्च १९८३ ला ‘स्त्री’चा पहिला प्रयोग झाला. त्यावेळी कुणी कल्पनाही केली नव्हती, की या नाटिकेचे पुढे सव्वाशे प्रयोग होतील म्हणून. काही नाटय़संस्थांमध्ये चार-पाच स्त्री-कलावंत असणाऱ्या त्या काळात ‘स्त्री’मध्ये २०-२५ मुली आलटून पालटून प्रयोग करीत होत्या. शुभांगी संगवई, प्रतीक्षा लोणकर, प्रतिमा लोणकर, सरिता, ऊर्मिला, उज्ज्वला (कुलकर्णीज्), सुषमा बिंदू, मंगल काटे, नीता पानसरे, निमा नेवासेकर अशी ‘स्त्री’ची गँग.. एकांकिका-नाटकांमुळे सामील झालेले अभय जोशी, आरती वैद्य, विवेक ढगे, गिरीश गोगटे, कमलेश महाजन, अनिता वेताळ..  बालनाटय़ामुळे आलेले आशुतोष भालेराव, मिलिंद जोशी, श्रीपाद पद्माकर, जितेंद्र कुलकर्णी, समीर पाटील यांच्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजमधल्या गुलमोहराच्या झाडाखाली जमणारं कोंडाळं वाढतच गेलं. वर्तुळ विस्तारत परीघ मोठा होत गेला. संस्थेचं नाव काय ठेवू या, यावरही खूप चर्चा झाली. एका रात्री उशिरा शुभांगी संगवई (गोखले) माझ्या घरी लुनावर आली ती चक्क पन्नासेक नावांची यादी घेऊनच. शेवटी शिक्कामोर्तब झालेलं नाव त्या यादीमधलंच.. ‘जिगीषा’- जिंकण्याची इच्छा!

त्याच वर्षी प्रशांतनं पहिलं दोन अंकी नाटक लिहिलं- ‘मदर्स हाऊस’! हे नाटक लिहिताना तो होता केवळ २२ वर्षांचा. आणि पहिलं मोठं नाटक दिग्दर्शित करणारा मी होतो २० वर्षांचा! जाणीवपूर्वक आपल्या पाच मुलांना समाजापासून दूर नेऊन निसर्गाच्या सान्निध्यात त्यांच्यावर संगीत, नृत्य, चित्रकला, साहित्याचे संस्कार करणाऱ्या जगावेगळ्या आईची ही गोष्ट! बाहेरच्या समाजात, शिक्षण, कलाक्षेत्रात सत्त्व आणि स्वत्व ओरबाडलं जातं, तिथं ‘ओरिजनॅलिटी’चा विचारच होत नाही- अशी अनवट मांडणी होती या नाटकात. नेपथ्य, प्रकाश, संगीत असा सर्वागीण वाव असलेलं हे एक जिवंत दृश्यचित्र होतं. सुजाता कानगो, वसंत लिमये हे सीनियर नट आणि २०-२२ वयोगटातली पाच मुलं असं हे नाटक उभं करणं ‘चॅलेंजिंग’ होतं. या नाटकानं माझी दिग्दर्शकीय दृष्टी आरपार बदलून टाकली. जणू रंगमंचावरच्या गच्च, मिट्ट  काळोखात डोळे फाडून पाहता पाहता बुब्बुळं मोठी होत गेली आणि मग स्वत:वर अंधार करवून घेऊन समोरच्या उजळत्या अवकाशात हळूहळू नाटक घडताना दिसायची सुरुवात इथं पहिल्यांदा झाली! पडदा उघडल्यानंतर पहिली दहा मिनिटं एकही संवाद या नाटकात नव्हता. कम्पोझिशन्स, हालचाली, संवादांशिवाय रंगव्यवहाराचा विचार करण्याची सवय आणि शिस्त या पहिल्याच नाटकानं मला लावली. त्या वर्षी मुंबईच्या अंतिम फेरीत औरंगाबाद केंद्राची दोन्ही नाटकं दळवी बंधूंची होती- ‘मदर्स हाऊस’ आणि ‘आपल्या बापाचं काय जातं?’! या पहिल्याच प्रयत्नाला दिग्दर्शन, अभिनयाची पारितोषिकं मिळाल्यामुळे अर्थातच आत्मविश्वास वाढला. तेव्हापासून प्रशांतनं लिहिलेला प्रत्येक शब्द मी दिग्दर्शित करत आलोय. हा सहप्रवास गेली ३७ वष्रे सुरू आहे. आणि फ्रेंड-फिलॉसॉफर-गाइड या तिहेरी भूमिकेतला प्रशांत कायम माझ्याबरोबरच आहे.

आमचं दुसरं नाटक होतं- ‘पौगंड’! किशोरावस्था ते तारुण्य यातला अवघड, नाजूक टप्पा म्हणजे पौगंडावस्था. शारीरिक जाणिवा वेगळ्या, घरातून व बाहेरून मिळणारे संस्कार आणि विचार वेगळे. या अवघड वळणावरचं एक तरल काव्यच होतं ‘पौगंड.’ कोलाजरूपातला एक कोरस प्ले! सेक्सपासून सानेगुरुजींपर्यंत सगळ्या नेमक्या भावभावनांना प्रशांतनं अत्यंत प्रभावी आकृतिबंधात गुंफलं होतं. या नाटकामुळे ‘जिगीषा’ला स्वत:चं मर्म सापडलं. त्यातली प्रशांतनं साकारलेली सानेगुरुजींची भूमिका आजही पुण्या-मुंबईच्या रंगकर्मीच्या पक्की स्मरणात आहे.

प्रत्यक्ष रंगमंचावर उत्तम अभिनय करणारी अभय जोशी, सरिता कुलकर्णी, सुजाता कानगो, प्रतीक्षा लोणकर, आरती वैद्य, मिलिंद सफई, विवेक पत्की अशी मोठ्ठी फळी ‘जिगीषा’त होती. लेखन (प्रशांत दळवी), दिग्दर्शन (मी), नेपथ्य-संगीत (मिलिंद जोशी), अभिनय-प्रकाशयोजना (अभय जोशी), व्यवस्थापन-निर्मिती (श्रीपाद पद्माकर, जितेंद्र कुलकर्णी), आर्थिक नियोजन (प्रकाश वैद्य, ऊर्मिला कुलकर्णी), स्मरणिका (दिलीप काळे, विवेक पत्की) असं ‘स्पेशलायझेशन’ खूप लवकर झालं. प्रत्येकाला अचूक ‘फोकस’ मिळाला. जिगीषाच्या अशा भक्कम पायाभरणीमुळेच आम्ही आज सगळे सातत्यानं कार्यरत आहोत. आमच्यापैकी कुणी अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवताहेत, कुणी वेशभूषाकार, संगीत दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करताहेत, तर कुणी चित्रपटाचा कार्यकारी निर्माता, नाटय़निर्माता म्हणून आत्मविश्वासानं वावरताहेत.

कुठलं नाटक करायचं? तेच का करायचं? अनुभवाच्या कक्षा कशा रुंदावत जातील? तालमी ते प्रयोग हे नियोजन शिस्तबद्ध कसं होईल? नव्या आयडियाज् काय? या साऱ्याचा रोज संध्याकाळी माझ्या घरी जमणाऱ्या अड्डय़ावर काथ्याकूट व्हायचा. ‘आजची-उद्याची कामं’ याच्या तपशीलवार याद्यांनी रजिस्टरची पानं भरून जायची. दिवसा कॉलेज, काहींची नुकतीच लागलेली नोकरी आणि संध्याकाळ ते रात्री उशिरापर्यंत ‘जिगीषा’मध्ये जमणं- हाच या पाच वर्षांचा ‘दिनरात्रक्रम’! नाटकाच्या आदल्या दिवशी स. भू. नाटय़गृहात सेट-लाइटस् करताना मुलीही रात्रभर जागत. तालमी-प्रयोगानंतर प्रत्येक मुलीला घरापर्यंत सोडायलादेखील एकेक जण नेमलेला असे. रोज माझ्या घरी जमणाऱ्या ‘जिगीषा’चं आतिथ्य आणि बडदास्त ठेवायला आईबरोबरच माझी बहीण संगीताही तत्पर असे.

‘हौशी’ या शब्दातून ध्वनित होणारा मर्यादित अर्थ जणू आम्हाला मान्यच नव्हता! विविध शैलींतला नाटय़ानुभव घेताना-देताना एक सफाई, कौशल्य अशी चोख ‘व्यावसायिकता’ अंगी बाणवण्यासाठी आम्ही राबत होतो. नाटक-सिनेमा पाहायला, भाषणं ऐकायला जाताना ‘आख्खी’ जिगीषा टीम जेव्हा एकत्र जात असे तेव्हा सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे वळत. त्यात कुतूहल असे आणि आदरही! आज लक्षात येतं की, प्रत्यक्षात दहा-बारा वर्ष लागतील एवढं दर्जेदार काम ‘जिगीषा’नं तेव्हा अवघ्या पाच-सहा वर्षांतच करून दाखवलं. फक्त नाटक आणि नाटक असाच ‘जुनून’ होता सगळ्यांच्या डोक्यात.

‘जीत की खातिर बस जुनून चाहिए,

जिस में उबाल हो ऐसा खून चाहिए।

ये आसमान भी आएगा जमीनपर,

बस इरादों में जीत की गूँज चाहिए..!’

(पूर्वार्ध)

– चंद्रकांत कुलकर्णी

chandukul@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 1:08 am

Web Title: theatre director chandrakant kulkarni articles in marathi on unforgettable experience in his life part 4
Next Stories
1 यंग डिबेटर्स, स्ट्रीट प्लेज् आणि गझल!
2 ईस्टमनकलर!
3 गारूड!
Just Now!
X