दिघा येथील बेकायदा बांधकामांच्या कचाटय़ात सापडलेल्या राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांचे पद धोक्यात आले असतानाच बेकायदा बांधकामांत राहणाऱ्या इतर ११ नगरसेवकांच्या डोक्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. झोपडपट्टी व ग्रामीण भागात राहणाऱ्या काही नगरसेवकांची नावे या यादीत आहेत. पालिका आयुक्त दिनेश वाघमारे हे यादीवर लवकरच निर्णय घेणार आहेत. स्मार्ट सिटीला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा यात समावेश आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसवेकांनी विरोध केला आहे. त्यामुळे नगरसेवकांवर वचक निर्माण करण्यासाठी ही करवाई लवकर होण्याची शक्यता आहे.
ठाणे व कल्याण डोंबिवलीतील काही नगरसेवकांना तेथील आयुक्तांनी अपात्र ठरविले आहे. त्याच धर्तीवर बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणारे किंवा बेकायदा बांधकामांत निवासस्थान असलेल्या नवी मुंबईतील नगरसेवकांच्या डोक्यावर ही अपात्रतेची तलवार लटकत आहे. यात दिघा येथील नवीन गवते, त्यांची पत्नी अपर्णा गवते व दीपाली गवते यांचा समावेश आहे. दिघा येथील ९९ बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यातील काही बांधकामांवर एमआयडीसीने कारवाई केली आहे. शिल्लक बेकायदा बांधकामांवर लवकरच टप्याटप्याने कारवाई होणार आहे. या प्रकरणी नऊपेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल झाले असून दोन जणांना जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या गवते कुटुंबापैकी तिघांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.
या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अलविदा करण्याचे ठरविले आहे. दिघा येथील नागरिकांचा प्रश्न सोडविणाऱ्या पक्षाच्या पाठीशी आम्ही उभे राहणार असल्याचे या नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे नगरसेवक शिवसेनेच्या गोटात जाण्याची शक्यता आहे, मात्र त्यामुळे अपात्रतेची तलवार टळणार नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दिघा प्रकरणात ठळकपणे सहभाग

ग्रामीण भाग व झोपडपट्टी भागातील बेकायदा घरात राहणाऱ्या नगरसेवकांचा क्रमांक या अपात्र नगरसेवकांच्या यादीत लागण्याची शक्यता आहे. अपात्रतेच्या या यादीत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे अनेक नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत.