नवी मुंबई: कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय घोटाळा प्रकरणी फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आले आहे तर कांदा बटाटा बाजार समितीचे माजी संचालक अशोक वाळुंज यांची चौकशी करण्यात आली होती. हि अटक बुधवारी संध्याकाळी करण्यात आली असून अन्य संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे . या प्रकरणी शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि साताराचे विद्यमानत उमेदवार शशिकांत शिंदे यांना अंतरिम जमीन मिळालेला आहे.
हेही वाचा >>> शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
कृषी उत्पन्न बाजार समितीत शौचालय चालविण्यास देण्यात येणाऱ्या कंत्राट मध्ये अत्यंत कमी दरात कंत्राट देत शासनाचे ७ कोटी ६१लाख ४९हजार ६८९ रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करीत गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. गेले काही महिने या प्रकरणात कुठलीही प्रगती नव्हती. मात्र मंगळवारी अचानक कांदा बटाटा बाजार समितीचे माजी सभापती अशोक वाळुंज यांना चौकशी साठी गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. तर बुधवारी संध्याकाळी फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना थेट अटक केले आहे. संजय पानसरे हे एपीएमसीतील सर्व बाजार समितीतील संचालक पैकी सर्वाधिक ताकदवर संचालक समजले जातात. त्यांनाच अटक झाल्याने अन्य माजाची संचालकांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा >>> काँक्रीटीकरणामुळे ‘पामबीच’वर वाहतूककोंडी
याबाबत गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांना विचारणा केली असता संजय पानसरे यांना अटक केली असून शौचालय घोटाळा प्रकरणी अटक केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कांदा बटाटा मार्केटचे संचालक वाळुंज यांना चौकशी साठी बोलावण्यात आले होते. याला त्यांनी दुजोरा दिला मात्र अन्य तपशील सांगण्यात असमर्थता दर्शवली.
पार्श्वभूमी आशियातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजर समिती आवारात असणाऱ्या शौचालय चालवण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राट मध्ये विविध १९ प्रकारच्या अनियमीता आढळून आल्या होत्या. याच कारणाने सरकारचे ७ कोटी ६१लाख ४९हजार ६८९ रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका आमदार शशिकांत शिंदे यांच्या सह अन्य सात असे एकूण आठ जणांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी नोव्हेंबर २०२३ मध्ये एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.आता पर्यंत या प्रकरणात पाच पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सात पैकी दोन जण समितीतील अधिकारी आहेत तर अन्य कंत्राटदार आहेत. तर शशिकांत शिंदे यांना अंतरिम जामीन देण्यात आलेला आहे.