शिक्षेतून मुक्ती मिळाल्याचा आनंद

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त गंभीर गुन्हे नसलेल्या आणि दोन तृतीयांश शिक्षा भोगलेल्या ३१ कैद्यांना शुक्रवारी तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सोडण्यात आले. शिक्षेचा कालावधी शिल्लक असतानाही सोडण्यात आल्याने या कैद्यांनी शिक्षेतून मुक्ती मिळाल्याचा आनंद व्यक्त करीत कारागृहात मिळालेल्या चांगल्या वर्तणुकीबद्दल समाधान व्यक्त केले.

कित्येक वर्षे चार भिंतींत राहिलेल्या कैद्यांचा आंनद अवर्णनीय होता. त्यांच्या भेटीसाठी आतुरलेल्या कुटुंबीयांनी सकाळपासूनच येथे हजेरी लावली होती. तळोजा जेलमध्ये एकूण ३१०० कैदी असून किरकोळ गुन्हा असलेले आणि त्यांनी दोन तृतीयांश शिक्षा भोगलेल्या ३७ कैद्यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून सोडण्यात आल्याचे तळोजा मध्यवर्ती कायालयाचे अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांनी सांगितले.

आपल्या पतीच्या भेटीसाठी अतुलरेल्या शबाना यांनी, माझ्या पतीला दोन वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र त्यांची गांधी जयंती निमित्ताने विशेष माफी मिळाल्याने नऊ महिने शिक्षा भोगून मुक्तता करण्यात येत असल्याचे सांगितले.

कैदी परवेश कुमार बुद्धिराम गौर यांनी सांगितले की, अपघातामुळे मला दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली होती. माझ्या शिक्षेचा कालावधी अजून चार महिने बाकी आहे. मात्र मला शिक्षा माफ झाल्याने सोडण्यात आले.

मला वर्षांची शिक्षा झाली होती. नऊ महिने शिक्षा भोगून माझी सुटका झाली. जेलमध्ये चांगल्या गोष्टी शिकवण्यात आल्या. त्यानुसार पूर्वीच्या चुका सुधारून मी चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास सुटका झालेला कैदी अब्दुल शेख यांनी व्यक्त केला.

गांधी जयंतीनिमित्त कारागृहात कैद्यांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले होते.यात सर्वोदय मंडळातर्फे महात्मा गांधी यांची शिकवण व विचार यातून समाज सुधारणा व पुनर्वसन याबाबत कैद्यांना मुख्य प्रवक्ते प्रेमचंद तिवारी यांनी मार्गदर्शन केले. तसेच या विचरातून प्रभावित झालेले व कारागृहातून शिक्षा माफ झालेले लक्ष्मण गोळे याने या विचारातून सामाजिक स्थैर्य कसे प्राप्त होते याबाबत अनुभवकथन केले.  तसेच सर्वोदय मंडळातर्फे महात्मा गांधी यांच्या जीवनावरील माझी आत्मकथा या पुस्तकाचे वाटप करण्यात आले होते.

ज्योतीला अश्रू अनावर झाले

आपले वडील जेलमधून सुटणार म्हणून ज्योती गौर या वडिलांना घेण्यासाठी आल्या होत्या. सकाळपासूनच त्या गेटबाहेर वाट पाहत होत्या. खूप दिवसांनी वडिलांनी पाहिल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले.