१ जुलै रोजी पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते उपक्रमास प्रारंभ
पर्यावरण वाचविण्यासाठी राज्याच्या वने मंत्र्यांनी वृक्षारोपनाचा उतारा काढल्याने जुलै महिन्याच्या आरंभी वृक्षारोपनाला सामाजिक चळवळीचे रुप मिळणार आहे. वनमंत्र्यांनी मनावर घेऊन विविध विभागांच्या प्रमुखांना या वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिल्याने १ जुलैला वृक्षारोपणाचा सामुहिक सण विविध विभागांच्या सरकारी कार्यालयांमध्ये साजरा होताना यंदा पाहायला मिळणार आहे. रायगड जिल्ह्य़ात चार लाख २१ हजार तसेच पनवेल तालुक्यात ५० हजार रोपांची लागवड करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. या लागवडीचा शुभारंभ १ जूलै रोजी सकाळी पनवेल तालुक्यामधील देहरंग धरणाजवळ रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते होणार असून हा उपक्रम महसूल विभागाने आयोजित केला आहे.
रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले-तेली यांनी हा उपक्रम जिल्हाभर राबविण्यासाठी बैठकांचे सत्र घेऊन विविध प्रांतधिकारी, तहसीलदार यांना त्यांच्या परिसरातील विविध सरकारी कार्यालयातील जागांमध्ये रोपे लावण्याच्या सूचना केल्या आहेत. पनवेलचे प्रांताधिकारी भारत शितोळे यांनी पनवेल तालुक्यातील पोलीस ठाण्यांपासून ते पंचायत समितीच्या देखरेखीखाली चालणाऱ्या ग्रामपंचायतींना तशा लेखी सूचना दिल्या आहेत. या सूचनांमध्ये कोणत्या जातीची रोपे लावली, त्यासाठी लागणारा खड्डा, रोपना वेळेचे छायाचित्र, या वृक्षाचे संवर्धन करणाऱ्या व्यक्तींची नावे अशा पद्धतीने तपशीलवार पुन्हा लेखी पद्धतीने अहवाल सादर करण्याचे आदेश प्रांताधिकारी शितोळे यांनी दिले आहे. जिल्ह्य़ात सर्वाधिक वृक्ष लागवड पनवेल तालुक्यात होणार असल्याने सध्या प्रत्येक सरकारी कार्यालयात १ जूलैला होणारी वृक्ष रोपनाची चर्चा आहे. काही कार्यालयांना प्रांताधिकाऱ्यांच्या आदेश आल्याने लागवड करू मात्र रोपे कोण देणार असा प्रश्न पडला आहे. यावरही प्रांतधिकारी शितोळे यांनी सामाजिक वने विभागाकडून मागणीनूसार संबंधित विभागाला रोपे मिळतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक सामाजिक संस्था पर्यावरण बचावासाठी पुढे सरसावल्या असून त्यांनी सरकारी या सामाजिक चळवळीमध्ये सक्रीय सहभाग नोंदविला आहे.