उरणमधील जनजागृतीनंतरही भाविकांचा अल्प प्रतिसाद; जलप्रदूषणाचा धोका

गणेशोत्सवात गणेशमूर्तीचे विसर्जन करताना निर्माल्य तलावात विसर्जित करून तलाव प्रदूषित करू नयेत. त्यासाठी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशांचा वापर करावा, असे आवाहन अनेक सामाजिक व धार्मिक संघटनांनी विविध माध्यमांतून आणि वारंवार केल्यानंतरही निर्माल्य तलावातच टाकले जात आहे. त्यामुळे तलावांचे पाणी दूषित होऊ लागले आहे.

पाच दिवसांच्या गणपती तसेच गौरींचे सोमवारी मोठय़ा थाटात विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्या दिवशी विसर्जन तलावाच्या परिसरात अनेक सामाजिक संस्था तसेच विविध धार्मिक संघटनांकडून गणेशभक्तांसाठी विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. उरण नगरपालिकेने आणि अनेक संघटनांनी निर्माल्यकलशही पुरविले आहेत.

कचरा वेचण्याचे कामही स्वयंसेवकांकडून केले जात आहे. तरीही येथील विमला तलाव तसेच गावागावांतील तलावांतच निर्माल्य टाकण्यात आले आहे. त्यामुळे या तलावांचे पाणी दूषित झाले आहे. अनेक संस्था सध्या या निर्माल्यापासूनच खत निर्मिती करत आहेत.

विसर्जनाला व्यवस्था

नवी मुंबईत पाच दिवसांच्या गणरायाला गौरीसह सोमवारी मोठय़ा भक्तिभावाने निरोप देण्यात आला. या दिवशी २३ विसर्जन तलावांवर १५,८३९ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. पालिका, वाहतूक पोलीस व पोलिसांच्या वतीने तलावांवर विसर्जनासाठी चोख व्यवस्था होती. पालिकेने सात दिवसांच्या गणेशाचे आणि अनंत चतुर्दशीला (रविवारी) सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे.