ध्वनिप्रदूषणसंबंधी नियमांचा भंग
पाच दिवसांच्या गौरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पनवेलमधील दोन मंडळांची शहर पोलिसांनी नोंद घेतली आहे. या दोन मंडळांपैकी एका मंडळाने मिरवणुकीत नाशिक ढोलताशांचा ढणढणाट केला, तर दुसऱ्या मंडळाने ध्वनिवर्धकाचा अतिरेकी वापर केल्याने ही नोंद घेण्यात आली. दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशाचे विसर्जन दणक्यात करू पाहणाऱ्या मंडळांना या कारवाईमुळे चाप बसेल, अशी अपेक्षा आहे.
पनवेल शहरामधील अडीच हजार गौरी गणपतींचे सोमवारी उत्साहात विसर्जन झाले. या विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोलताशांनीही ६५ डेसिबल्स आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळे पोलिसांनी त्याची दखल घेतली. बावन्न बंगला येथील नीलकंठ गार्डन हाऊसिंग सोसायटी या मंडळाने मिरवणुकीसाठी दहा ढोलताशांचे नाशिक ढोल पथक बोलावले होते. या ढोलताशांच्या निनादाने आवाजाची मर्यादा ओलांडली. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. तसेच तक्का येथील महेंद्र बहिरा यांच्या घरगुती गणपती विसर्जनादरम्यान डीजेचा कानठळ्या बसणारा आवाज नियमभंग करणारा होता. पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत या दोषींविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या असून गणेशोत्सव पार पडल्यानंतर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.