सर्व शिक्षा अभियानाला हरताळ फासणारी घटना नवी मुंबईतील एका खासगी इंग्रजी शाळेत घडली. एकल पालक असल्याने एका महिलेच्या मुलाला शाळेत प्रवेश नाकारण्यात आला. संबंधित महिला पालकाने शाळेच्या मुख्याध्यापकासोबत झालेला संवाद मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.

जुईनगर येथे राहणाऱ्या सुजाता मोहिते या एका कंपनीत सेल्स विभागात नोकरी करतात. त्या आपल्या पतीपासून विभक्त झाल्या असून मुलगा सुजाता यांच्याकडेच असतो. सुजाता यांना मुलाला आयसीएसई बोर्डऐवजी त्याला राज्य बोर्डमध्ये टाकायचे असल्याने त्यांनी वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेशी संपर्क साधला. मात्र प्रवेश पूर्ण झाल्याने शक्य नसल्याचे सांगण्यात आले. सुजाता यांनी ओळखीमार्फत शाळा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना मुख्याध्यापकांनी उर्मटपणे उत्तर दिले.

एकल पालकांच्या पाल्यांना प्रवेश देत नसल्याचे सांगत त्यांच्या मुलाला प्रवेश नाकारण्यात आला. एकल पालक असल्याने मुलाचा अभ्यास घेऊ शकत नाही असे कारणही सुजाता यांना देण्यात आले. या संभाषणात मुख्याध्यापकांनी ज्या व्यक्तीने सुजाता यांना आणले होते त्यालाही झापले. ‘असले लोक कशाला घेऊन येता’ असे त्यांनी त्या व्यक्तीला सांगितले होते.

सुजाता यांनी “प्रवेश  घेतल्यावर पालक विभक्त झाले तर ?”, असा प्रश्न विचारला असता “मग नाईलाज आहे”, असे उत्तर मुख्याध्यापिकेने दिले. मात्र ज्यांच्या ओळखीने सुजाता या पुन्हा शाळेत गेल्या होत्या त्यांनी प्रवेश निश्चित होईल तुम्ही दाखला काढून आणा व शुल्क भरून टाका, असा निरोप सुजाता यांना दिल्याने त्यांनी मुलाचा दाखला काढला. या बाबत मुख्याध्यापिकेशी चर्चा केल्यानंतर “मी दाखला काढण्यास सांगितला का?”, असा उर्मट उलटप्रश्न त्यांनी केल्याचा दावा मोहिती यांनी केला.

या प्रकरणी ‘लोकसत्ता’ने शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाळा प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.