डॉ. संजीव म्हात्रे

गणपतीचा मखर ! म्हाणजेच आरास बनवता बनवता आजूस (आजोबा) ला विचारलं, ‘आजूस आपून गनपती कदीपासून मांडतून रं?’, त्यांचं अस्थिर शरीर, उभारी आल्यासारखे स्थिर झालं आणि थरथरणाऱ्या ओठांनी जुन्या आठवणी जाग्या केल्या. ‘तूजा बापूस जल्माला आला तवशी (तेव्हापासून) मांडताव आपून गनपती. तव काय रं बाला, समद्यंचीस परिस्तिती वाईट व्हती.’ आजूस आम्हाला त्यांच्या भूतकाळात घेऊन गेला.

श्रावणातल्या मंगळागौरींनंतर अमावास्येला आगरी समाजातील प्रत्येक कुटुंबामध्ये ‘पिठोरी अमावस्येचा’ सण साजरा होत असे.

आली पिठोरी गं दारी,

अंगी पत्रिची गं सारी.

सातु बयनी गं संगाती,

हाती पिठाच्या नं वाती.

दिवं लावनीचे गं पारी,

आली माऊली पिठवरी.

पावसाच्या सरींचा मंदावलेला वेग, धरतीवर दाटलेला हिरवा स्वर्ग आणि त्याच निसर्गातून उत्पन्न झालेली निसर्गदेवता पिठवरी. कुटुंबातील स्त्रिया, तेरडा,आडुळसा, नागवेल इ. वनस्पती ‘पत्री’ म्हणून गोळा करून एका सुपामध्ये सांजवेळी भक्तिभावाने घरात घेऊन येत असत. तत्पूर्वी पिठोरी स्थापनेची जागा शेणाने सारवून (पूर्वी आगरी गावांमधली घरे छपरांची व जमीन शेणानं सारवलेली असे.) तीथे तांदळाच्या पिठाने कणा (रांगोळी) भरीत असत. पिठोरी मातेला गरिबांची कुटुंबवत्सल देवता मानत. पिठोरी सायंकाळी येते आणि आशीर्वाद देऊन त्वरित निघून जाते आणि जाताना गणरायाच्या आगमनाची आठवण देऊन जाते.

एक कुटुंब एक गणपती अशीच प्रथा पूर्वी होती. तसंही त्याकाळी कुटुंब मोठी आणि अन्नधान्याची वानवा असायची. त्यात भादवा (भाद्रपद) म्हटला की रांजणातील तांदूळ तळाशी, तर कणगे (भात साठवणीचे कोठार) जवळपास रिकामे होत आलेले असत. मग साठवणीतले पैसेच काय ते या सणाचा उत्साह असे. आजूस सांगत होता..

बोलतं हौसंला मोल नाय रं,

पून हौस कराला, वटीनूस काय नाय रं.

तरी मांडीन तुला दर वरसाला,

गणा, तू पावशील नं माजे नवसाला.

तू तरी कोनला कोनला पूरशील रं,

कतीक जनांची आसवां पुसशील रं.

तरी पुर्म्यान तुजे मी, जालीन रं वातीला,

गणा, तू पावशील नं माजे नवसाला.

घरा आमची मातीनूस सजली रं,

निसोटाला तवी नं भाताला जोगली रं.

तरी तू जाताना, मी जागवीन तुजे मातीला,

गणा, तू पावशील नं माजे नवसाला.

गणपतीला मखराची आरास तयार करणं हा आगरी लोकांचा आवडता छंद. नारळाच्या झावळ्या, सुपारीची पाने, बांबू, केळीचे खोड, गेरू, चुना अशा अनेक जिन्नसांपासून ते उत्तम कलात्मक देखावे साकारत. आजही ही कला आगरी समाजाने जोपासली आहे.

रात्रभर जागून मखर बनविण्यात आम्हा मुलांचाही वाटा असे. तरीही सकाळी लवकरच जाग येई कारण बाप्पाची मूर्ती गणपतीच्या कारखान्यातून आणायची असे. कारखाना या शब्दाला अनुरुप तिथे काहीही नसे. एका झोपडीवजा छताखाली गावातील गणपतीचा कारखाना असे. आज्जी व आयवची गणरायाला आणायची वेगळीच तयारी असे. पाट व पाटावर एखाद किलोएवढे तांदूळ ती फडक्यात बांधून ठेवी, सोबत नारळ व एक नवा फडका जो बाप्पाच्या मूर्तीला झाकण्यासाठी असे. आबव डोक्यावर पाट घेऊन व आम्ही सर्व लहानगे त्यांच्या पाठीमागे स्पर्धेत चालल्यासारखे झपाझप पावलं टाकत निघत होतो. उत्कंठा वाढत जाई. शाळेत रांगेचं पालन न करणारे आम्ही, कारखान्यात शिस्तबद्ध एका मागोमाग बसलेले बाप्पा बघून त्याच्यासारखंच वागण्याचं मनात ठरवत असू. आजही असे अनेक कारखाने पेण तालुक्यात व इतरही गावांमध्ये कार्यरत आहेत. पेणच्या गणेशमूर्ती तर जगभरात प्रसिद्ध आहे. खंत एवढीच आहे की या व्यावसायिकांकडे शासनाने वा समाजधुरिणींनी त्यांच्या उत्कर्षांसाठी कधीही लक्ष पुरविलेलं मात्र दिसत नाही. आगरी समाज स्वाभिमानी असल्याने तो कधीच शासनाकडे याचना करीत नाही याचा अर्थ त्यांच्यासाठी काहीच करू नये असा होत नाही.

आबव डोक्यावर बाप्पा घेऊन गावातील नागमोडी वळणे घेत, तर कधी लगतच्या शेतांच्या बांधावरून चिखलात, पाय जपून टाकीत व बाप्पाला सांभाळीत घराच्या दारापाशी पोहचताच, दारातच तांदळाच्या पिठाचा कणा काढून त्यावर मूर्ती ठेवत असत. बाप्पाच्या मुखावरचा फडका बाजूला होई आणि सर्व कुटुंब आनंदाने भारावून जाई. बाप्पा मखरात बसला की त्याला तांदळाच्या पिठाचे नारळाच्या चोवेने भरलेले, उकडीच्या फुग्यांचा (करंजीच्या आकाराचे) नैवेद्य दाखवला जाई. आनंदाच्या उधाणाला भरती येत असे ती जागरणाला. आगरी समाजाचं स्त्रीप्रधानत्व याही सणात ठसठशीतपणे जाणवतं. ते रात्री गणरायाच्या जागरणाला नटूनथटून फेर धरून नाचताना.

आगरी स्त्रिया आपल्या पारंपरिक वेशभूषेत, जेमतेम गुडघ्याच्या खालपर्यंत परिधान केलेली काष्टीपातळं नेसत, रंगांमध्ये त्या भडक रंगाला प्राधान्य देत. अंगात चोळी व केसांमध्ये चांदवली. फुलांच्या कळ्यांनी गोलाकार व सभोवती झिपरीच्या (तंतुयुक्त पानांची पसरट फणीदार वनस्पती) पानांनी विणलेली चांदवली अंबाडय़ात शोभून दिसे. वैशिष्टय़पूर्ण पारंपरिक दागिने त्याची कांती सुशोभित करीत.

नृत्यासाठी तय्यार या सखीसंगिनी गोल फेर धरीत असत पारंपरिक अलिखित देवतांची व सामाजिक विषयांची स्वयंरचित ओवी व त्या ओव्यांना दिलेली पारंपरिक संगिताची साथ. स्त्रीच कवयित्री, स्त्रीच संगीतकार व तीच गायक असा सुरेल संगम अनेक आगरी कुटुंबांत अनुभवास मिळेल. माझ्या आईने मथुरा व्यंकटेश म्हात्रे, हा पारंपरिक कलेचा ठेवा मुद्रित करून ठेवला आहे. लुप्त होत चाललेल्या या कवनांची आठवण नवीन पिढीला नक्कीच होईल.

विसर्जनाला सर्वजण एकत्रित महाआरती म्हणत व एक एक करून मूर्ती विसर्जन करीत. आरती संपताच आम्ही मुलं धडाधड तलावामध्ये उडय़ा टाकत, आपला बाप्पा आपणच विसर्जित करायचा  आणि पुढच्यावर्षी लवकर ये असं त्याच्या कानात सांगायचं अशी भाबडी समजूत. आगमनाच्या वेळी जडजड भासणारा बाप्पा जाताना हलका वाटला. मनातल्यामनात विचारले तर म्हणाला, आनंद, सुख, समृद्धी घेऊन आलो होतो तुमच्यासाठी, सर्व इथेच ठेऊन तुमचं दु:ख घेऊन जातोय. आणि गणपत्ती बाप्पा मोरया म्हणत आम्ही बाप्पासोबतच पाण्यात बुडी मारली.