पोलिसांचे आवाहन; फसवणूक होण्याची शक्यता

खासगी दूरचित्रवाहिनीवर प्रचंड गाजलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे ५ वे  पर्व लवकरच सुरू होणार आहे. या पाश्र्वभूमीवर समाजमाध्यमांवर २५ लाखांच्या लॉटरीचे आमिष दाखवून संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे. नवी मुंबई पोलिसांनी याची दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.

लॉटरी लागल्याचे सांगून लाखो रुपये लुबाडल्याची प्रकरणे वारंवार घडत आहेत. सायबर गुन्ह्य़ांत अशा स्वरूपाच्या गुन्ह्य़ांचे प्रमाण मोठे आहे. गुन्हेगार आपली बाजू पटवून देण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरतात. सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाच्या नावाचा वापर करून व्हॉट्सअ‍ॅपवर एक ध्वनिफीत प्रसारित करण्यात आली आहे. त्यात एक व्यक्ती तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली असल्याचे सांगते आणि बँक व्यवस्थापक सुनील सिंग यांच्याशी बोलून पैसे मिळवा, असे आवाहन करते.

कौन बनेगा करोडपतीची लॉटरी बंद करण्यात आली होती, ती आता पुन्हा नव्याने सुरू करण्यात आल्याचेही त्यात सांगितले जाते.

हा सायबर गुन्हेगारीचा प्रकार आहे. आतापर्यंत नवी मुंबईत तरी अशी फसवणूक झालेली नाही, मात्र अशा प्रकारे पैसे मिळाल्याचेही उदाहरण नाही. कुणीही अशा प्रकारच्या संदेशांवर विश्वास ठेऊ  नये. ध्वनिफितीचा तपास सुरू आहे.

– तुषार दोषी, उपायुक्त, गुन्हे शाखा