भारत अपार्टमेंट, वाशी
महिला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यासाठी तिच्या मनातून येणारा आत्मविश्वास, आणि धाडस हे तिला पाठबळ देत आहेत; मात्र ते पाठबळ जर घराघरातून आणि संकुलाच्या छोटय़ाशा व्यासपीठावरून मिळत गेली कि त्या महिलांची स्वत:ला जगासमोर सादर करण्याची एक नवीन दृष्टी प्राप्त होते. महिलांनी दूरदृष्टीतून समाजासमोर स्वत:ला सिद्ध करावे हाच प्रयत्न या ‘भारत’संकुलात केला जात आहे.
वाशीत १९८४ साली बांधण्यात आलेल्या भारत अपार्टमेंटमध्ये सुरुवातीला नित्यनियमांचे सण साजरे केले जात होते. कालांतराने महिलांना सक्षम बनविण्यासाठी अनेक उपाय योजना राबविण्यात आल्या. आजही गृहिणी चार भिंतीमध्येच आपले जग मानीत आल्या आहेत. विविध उपक्रमात, सामाजिक कार्यात वा अन्य कामात सहभागी होण्यास पुढे सरसावत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना पुढे जाण्यासाठी पाठबळ देणारी व्यक्ती भेटलेली नसते. वाशीतील ‘भारत अपार्टमेंट’मध्येहि गेली काही वर्षे हाच अनुभव येत होता. मात्र त्यानंतर हळूहळू महिलांनाही प्रत्येक कामात बोलते करावे, असा ध्यास घेत येथील महिलांनी स्वत:ला सिद्ध करण्यासाठीएक पाऊल पुढे टाकले. संकुलातील सायली दुधवडकर यांनी पुढाकार घेऊन महिलांना एकत्र आणले. १९२ कुटुंबांतील महिला आता प्रत्येक सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन काम करण्यासाठी तत्पर असतात. गेली तीन वर्षे महिला मराठी नववर्षी म्हणजेच पाडव्याला एकत्र येतात. याशिवाय संकुलातील सदस्यांना सोबत घेऊन रॅली काढतात. या रॅलीमधून अनेक विषयांना हात घालत जनजागृती केली जाते. रॅलीतून ‘बेटी बचाओ -बेटी पढाओ’, जल बचतीबाबतचे सामाजिक संदेश देण्यात आले आहेत. या वेळी मोठी रॅली काढून महिला स्वत: लेझीममध्ये सहभागी होतात. आठवडय़ातून एक दिवस महिलांसाठी एक सायंकाळ आयोजित केली जाते. या वेळी महिला लहान मुलांना एकत्र जमवून मनोरंजनाचे खेळ, कलाकृती सादर करतात.
घरात कामे करून थकलेली गृहिणी या निमित्ताने ताजेतवान्या होतात. ८ मार्च महिला दिनी येथे वेगवेगळे कार्यक्रम सादर करून महिलांना सक्षमीकरणाचे धडे दिले जातात. येथील हौशी गृहिणी ढोल वादनाचे प्रशिक्षण घेऊन प्रत्येक समारंभात हिरीरीने सहभागी होत असतात. २६ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात महिला नृत्यही सादर करत असतात. बालसंगोपनासाठी येथील मोठी मंडळी जागृत आहेत. ३१ डिसेंबरला महिला घरी विविध पदार्थ बनवून संकुलातील सर्वाना एकत्र घेऊन बनवलेल्या पदार्थाचा आनंद घेतात. अशा पद्धतीने नववर्षांची मेजवानीही साजरी केली जाते. यातून त्यांची पाककलेतील रूची स्पष्ट होते. हळदी- कुंकू समारंभात मुस्लिमधर्मीय महिलाही सहभागी होतात.
आनंद मेळाव्यातून व्यासपीठ
आनंद मेळाव्यातमध्ये गृहिणी ज्या कार्यात निपुण आहेत, त्यापद्धतीने अनेक महिला कलाकारी व्यासपीठावर सादर करीत असतात. पाककला, हस्तकला, शिवणकाम आदी क्षेत्रात येथील स्वत: कलाकृती सादर करतात. त्यांनी बनवलेल्या वस्तूंचे आणि पदार्थाचे संकुल परिसरातच प्रदर्शन भरविण्यात येते. अशा स्वरुपाच्या आनंद मेळाव्यातून त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2017 4:50 am