पाण्याची दुर्गंधी; स्थानिकांच्या डोळ्यांची जळजळ

पनवेल : तळोजा वसाहतीलगत स्थानिकांनी केलेल्या खोदकामात चक्क निळे, काळे पाणी लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डोळ्यांची जळजळ होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कंपनीचे जमिनीत मुरलेलेच हे रासायनिक पाणी असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तर कंपनी प्रशासनाने हा दावा खोटा असल्याचे सांगितले.

तळोजा औद्योगिक वसाहती परिसरातील पेंधरगावालगत कोपरकर कुटुंबीय आपल्या खाजगी जागेत इमारतीसाठी खोदकाम करीत आहेत. बुधवारी दुपारी या खड्डय़ात साचलेले पाण्याची दुर्गंधी येऊ लागली. पाहणी केली असता, ते पाणी निळे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचा उग्रवास येत असून डोळ्यांना जळजळही होत आहे. शेजारी लासन इंडिया प्रा लिमिटेड कंपनी असून सौंदर्य प्रसाधनासाठी वापरण्यात येणारी पावडर तयार करण्यात येते. या कंपनीचेच हे रासायनिक पाणी असल्याचा आरोप  कोपरकर कुटुंबीयांनी केला आहे. हे दाखविण्यासाठी कंपनी प्रशासनाला बोलावून घेतले असता हे रासायनिक पाणी आमच्या कंपनीच्या माध्यमातून आले नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकारामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

तळोजा परिसरात सुमारे ९०७ हेक्टर क्षेत्रात तळोजा औद्योगिक वसाहत असून सुमारे ८२० लहानमोठे कारखाने आहेत. यामध्ये रासायनिक कारखाने मोठय़ा प्रामाणात आहेत. रात्रीच्या वेळी हवेत रासायनिक वायू सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करीत आहेत. संध्याकाळच्या वेळी नाक मुठीत घेऊनच औद्योगिक वसाहतीत प्रवेश करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

आम्ही कॉलमसाठी खड्डे खणले आहेत. त्यातून  निळे, काळे रासायनिक पाणी येतं आहे. त्यामुळे दुर्गंधी सुटून डोळ्यांची जळजळ होत आहे. कंपनी प्रशासनाला यासंदर्भात विचारणा केली असता, ते पाणी आमचे नसल्याचे ते सांगत आहेत, मग हे घाण पाणी आले कुठून?

-गौरव कोपरकर, ग्रामस्थ, पेंधर.

आम्ही स्वत: त्या ठिकाणी जाऊन आलो आहे. ज्या ठिकाणी हे खड्डे खणणं सुरू आहे, त्याठिकाणी आमचं कोणतंही रासायनिक यंत्र संच नाही. त्या ठिकाणी आमचं पावडर पॅकिंग विभाग आहे. रासायनयुक्त पाणी इथपर्यंत येणं शक्यचं नाही.

-विशाल तांबे, लार्सन इंडिया प्रा. लिमिटेड, प्रशासन अधिकारी.