खारघरमधील पांडवकडा येथे शनिवारी बुडालेल्या चार विद्यार्थिनींपैकी चौथ्या मुलीचा मृतदेह सोमवारी दुपारी एक वाजता बेलापूर येथील खाडीपात्रालगत सापडला.

पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तिच्या नातेवाईकांना बोलाविले होते. नेहा दामा असे तिचे नाव असून ती कोपरखैरणे येथे राहत होती. शनिवारी नेहासह आरती नायक, नेहा जैन,  श्वेता नंदी (ऐरोली) तीन मैत्रिणी वाहून गेल्या होत्या.

अग्निशमन दलातील जवान व पोलिसांच्या संयुक्त बचावदलाच्या पथकाने वाहून गेलेल्या आरती, नेहा जैन आणि श्वेता नंदी यांचा शोध शनिवारीच लावला होता. मात्र नेहा दामा ही बेपत्ता होती. सोमवारी पावसाने उघडीप घेतल्यानंतर पाणी ओसरले आणि पांडवकडा ते बेलापूर या खाडीपात्रात ५० तासांनंतर नेहाचा मृतदेह आढळला.