घाऊक बाजारातील दरांत किलोमागे ५० ते ७५ रुपयांची वाढ

केरळमधील पुरामुळे घाऊक बाजारात वेलचीचे दर वाढले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारी वेलचीची आवक घटली असून दरांत प्रतिकिलो ५० ते ७५ रुपयांची वाढ झाली आहे. केरळहून येणाऱ्या नारळांच्या प्रमाणातही घट झाली असली तरी त्यांचे दर मात्र स्थिर आहेत. मिष्टान्नात अनन्यसाधारण महत्त्व असलेली वेलची सणासुदीच्या मुहूर्तावर महाग झाल्याने खिशाला झळ बसणार आहे.

केरळमधील पुरामुळे वेलचीचे प्रचंड नुकसान झाले आहे. केरळमधून लाखो टन वेलची देश-विदेशात निर्यात केली जाते. मुंबई कृषी उत्पन्न बाजारातही केरळहून मोठय़ा प्रमाणात वेलचीची आवक होते. मात्र गेल्या काही आठवडय़ांपासून केरळमध्ये झालेल्या पावसाने उभे पीक वाहून गेल्याने आवक मोठय़ा प्रमाणात घटली आहे. परिणामी घाऊक बाजारात मोठय़ा वेलचीच्या किमतीत ७५ रुपयांची तर बारीक वेलचीच्या किमतीत ४५ ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. मोठी वेलची मसाल्यात वापरली जाते तर छोटी वेलची मिष्टान्न आणि पानाच्या विडय़ात मोठय़ा प्रमाणात वापरली जाते. किमान सहा ते सात महिने तरी वेलचीच्या किमती चढय़ाच राहतील, असा अंदाज वेलचीचे व्यापारी कीर्ती राणा यांनी व्यक्त केला.

वेलची दोन आठवडय़ांपूर्वी ३०० ते ३५० रुपये किलोने घाऊक बाजारात तर ४०० ते ५०० रुपये प्रतिकिलोने किरकोळ बाजारात विकली जात होती. आता मोठय़ा वेलचीच्या घाऊक दरांत ७५ रुपयांची तर छोटय़ा वेलचीच्या दरांत ५० रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातील दर ४५० ते ६००च्या दरम्यान आहेत.

नारळांचे दर मात्र ‘जैसे थे’

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या नारळांपैकी केवळ १०-१५ टक्के नारळ केरळहून येतात. ८० टक्के आवक तमिळनाडूतून होते. त्यामुळे केरळमध्ये पडलेल्या पावसाचा परिणाम नारळाच्या दरावर झालेला नाही.