साडेबारा टक्के योजनेचे बोगस प्रकरणे तयार करून सिडकोची जमिन लाटणाऱ्या अधिकारी आणि भूमफियांचे कर्दनकाळ ठरलेल्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा आणि दक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा सरवदे यांची येत्या दोन दिवसांत बदली होणार असल्याची चर्चा आहे. या दोन्ही रणरागिणी अधिकाऱ्यांच्या कारकीर्दीला तीन वर्षांचा कालावधी झाला असून डॉ. सरवदे यांना पदोन्नती मिळाली आहे.
सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या आग्रहास्तव सिडकोत आलेल्या व्ही. राधा यांच्या सेवेला या महिन्यात तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. भाटिया यांची बदली मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदी झाल्यानंतर राधा अधिक काळ सिडकोत राहणार नाहीत, अशी चर्चा होती. राधा यांनी काही महिन्यापूर्वी केंद्रात जाऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे येत्या दोन दिवसात राज्यात होणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांच्या फेरबदलात राधा यांची बदली निश्चित मानली जात आहे. प्रस्तावित विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांसाठी विविध योजना राबविणाऱ्या राधा या कडक शिस्तीच्या प्रशासक म्हणून ओळखल्या जातात. साडेबारा टक्के विभागात गेली अनेक वर्षे सुरू असलेली अनागोंदी त्यांनी दक्षता विभागाच्या माध्यमातून शोधून काढली आणि त्यामुळे सिडकोची हजारो कोटींची जमीन वाचली. सवलतीच्या दरात भूखंड घेऊन शाळा, महाविद्यालय, तसेच विश्रामगृह बांधणाऱ्या संस्थांना वठणीवर आणण्याचे काम राधा यांनी केले आहे. पालिकेला वाशी येथे दिलेल्या रुग्णालयीन भूखंडाचा अर्धा भाग हिरानंदानी फोर्टिज रुग्णालयाला दिल्याने त्यांना नोटीस देण्याचे कामही राधा यांच्या काळात झाले आहे. सिडकोतील संशयास्पद प्रकरणाचा अभ्यास करण्याचे काम डॉ. सरवदे यांच्या दक्षता विभागाने केले असून हे सिडकोत पहिल्यांदाच पद निर्माण करण्यात आले आहे.