खासगी विकासकांपेक्षा किमती अधिक; गृह योजनेला थंड प्रतिसाद

तळोजा, खारघर, कळंबोळी, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच विभागांत बांधण्यात येणारी सिडकोच्या महा गृहनिर्मितीतील १४ हजार ८०० घरे खासगी विकासकांनी बांधलेल्या संकुलांतील घरांपेक्षा महाग असल्याची चर्चा सुरू आहे. सिडकोचा सर्व विभागांतील दर सारखा आहे, मात्र खासगी विकासकांचा दर हा गृहनिर्मितीच्या ठिकाणांवर अवलंबून आहे. तळोजा क्षेत्रातील सिडकोची घरे प्रति चौरस फूट ७ हजार ३०७ रुपयांना असताना खासगी विकासक या भागात तीन ते चार हजार प्रति चौरस फूट दराने गृहविक्री करत आहेत.

खासगी विकासकांना आता प्रकल्पाची महारेराकडे नोंदणी करून बांधीव क्षेत्रफळानुसार (बिल्ट अप) घर विकणे बंधनकारक करण्यात आल्याने यात कमी-अधिक क्षेत्रफळाचा प्रश्न उद्भवत नाही. यापूर्वी सिडकोच्या घरांचे बांधीव क्षेत्र खासगी विकासकांपेक्षा जास्त होते.

सिडकोच्या वतीने विविध पाच विभागांत महागृहनिर्मिती हाती घेण्यात आली. १४ हजार ८०० घरांच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी अर्ज विक्री १३ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली असून १५ ऑगस्टपासून अर्ज नोंदणीशुल्कासह अर्ज स्वीकारले जात आहेत. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन सुरू आहे. आणखी १५ दिवस हे अर्ज विक्री व नोंदणी सुरू राहाणार आहे. सिडकोने अत्यल्प उत्पन्न गटासाठी पाच हजार २६२ घरे बांधण्यास घेतली असून, ही सर्व घरे पंतप्रधान आवास योजनेसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. शिल्लक नऊ हजार ५७६ घरे ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी असून सर्वासाठी खुली आहेत. अत्यल्प उत्पन्न गटातील घरांचे क्षेत्रफळ हे २६० चौरस फूट असून अल्प उत्पन्न गटातील घरांचे क्षेत्रफळ ३०० चौरस फूट आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत १८ ते १९ लाख रुपये जाहीर करण्यात आली आहे. त्यावरील इतर खर्च गृहीत धरल्यास हे घर २० लाखांपर्यंत जाणार आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील घरे १९ लाख रुपयांची आहेत. त्यासाठी प्रति चौरस फूट ७ हजार ३०७ रुपये घेतले जात आहेत. हेच घर तळोजा, द्रोणागिरी यासारख्या अविकसित भागांत खासगी विकासक तीन ते चार हजार रुपये प्रति चौरस फूट दराने विकत आहेत. त्यामुळे २६० चौरस फुटांचे हे घर खासगी विकासकाकडून विकत घेतल्यास चार हजार रुपये प्रति चौरस फूट दराने १० लाख ४० हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे.

नोंदणी शुल्क आणि इतर खर्च गृहीत धरल्यास हे घर बारा लाखांच्या वर जाणार नाही. हीच स्थिती अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांबाबत आहे. अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांची घरे ही ३०० चौरस फूट क्षेत्रफळाची आहेत. सिडकोच्या योजनेत हे घर घेतल्यास आठ हजार ३३३ रुपये प्रति चौरस फूट दराने मिळत आहे. खासगी विकासकाकडे हेच घर चार हजार रुपये प्रति चौरस फुटाने विकत घेतले तरी १२ लाखांपर्यंत मिळणार आहे. इतर खर्च मिळून हे घरही चौदा लाखांपर्यंत मिळणे अपेक्षित आहे.

सिडकोने स्वस्त दरात घर विकणे अपेक्षित आहे. सिडकोच्या तुलनेत आमच्या घरांच्या किमती कमी आहेत, असे अरिहंत समुहाचे अशोक छाजेर यांनी सांगितले.

सिडको सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन गृहनिर्मिती करते. प्रकल्पाकडे जाणारे रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी प्रक्रिया केंद्र या सुविधा खासगी विकासकांपेक्षा नक्कीच जास्त असतात. त्यामुळेच सिडकोच्या घरांना जास्त मागणी आहे. मोकळी जागा, कार पार्किंग, उद्यान, रस्ते आणि ग्राहकांची दैनंदिन गरज लक्षात घेऊन तयार केलेली व्यापारी संकुले यांचा खासगी विकासक विचार करू शकणार नाही. तुलनात्मकदृष्टय़ा सिडकोची घरे खासगी विकासकांपेक्षा स्वस्त आहेत हे लक्षात येईल.

– लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक, महा गृहनिर्मिती, सिडको