पनवेल नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याच्या ठरावाच्या प्रस्तावाला पनवेल नगर परिषदेमधील सदस्यांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये एकमुखाने मंजुरी दिली. यामुळे महानगरपालिकेच्या मार्गातील प्रशासकीय अडचणी दूर झाल्या आहेत. कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास समितीला या ठरावामुळे बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. पनवेल नगर परिषदेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगर परिषदेचे सदस्य शिवदास कांबळे, लतिफ शेख, जयंत पगडे, रमेश गुडेकर यांनी नगर परिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला नगर परिषदेमधील विरोधी व सत्तेच्या बाकांवर बसणाऱ्या सदस्यांनी एकमुखाने मंजुरी दिली. शेतकरी कामगार पक्षाचे विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांनी याबाबत काही सूचना मांडल्या. पनवेल नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे हे सरकारने स्थापन केलेल्या अभ्यास समितीचे सचिव हे आहेत. या समितीला २४ डिसेंबपर्यंत सरकारला अहवाल सादर करायचा आहे. पनवेल नगरपालिका ही महानगरपालिका व्हावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सरकार दरबारी केलेल्या पाठपुराव्याची दखल या वेळी अनेक नगरसेवकांनी घेतली.