|| जगदीश तांडेल

उरणच्या खाडीकिनाऱ्यावरील मातीच्या भरावाचा परिणाम; खवय्यांना प्रतीक्षा

थंडीमुळे एकीकडे खोल समुद्रातील मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात उरणच्या खाडीकिनाऱ्यावरील मातीच्या भरावामुळे हिवाळ्यात प्रतीक्षा असणारे चविष्ट, कोळींब(रेपा), निवटय़ा, खुबेही गायब झाले आहेत. यात निवटय़ा, खुबे काही प्रमाणात सापडत असून ते महाग झाले आहेत. तर कोळींब सापडतच नसल्याने मासेखवय्यांबरोबर परदेशी पक्ष्यांचीसुद्धा पंचाईत झाली आहे.

उरणच्या खाडीकिनाऱ्यावर शेकडो वर्षांपासून येथील मिठागरे तसेच खाडीच्या मुखाजवळ हिवाळ्याच्या सुरुवातीला हे कोळींब, निवटय़ा तसेच खुबे यांसारखी मासळी मिळत होती, परंतु या परिसरात होत असलेल्या मातीच्या भरावामुळे येथील मासळीची मूळ ठिकाणे नष्ट होऊ लागली आहेत. त्यामुळे या मासळीच्या विक्रीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांनाही याचा फटका बसला आहे.

समुद्राप्रमाणेच खाडीमध्ये वेगवेगळ्या हंगामांत अनेक प्रकारची स्थानिक मासळी मिळते. या मासळीची येथील नागरिक, खवय्ये तसेच मासळी पकडून त्याचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांनाही प्रतीक्षा असते. मात्र या वर्षी समुद्रातून खाडीकिनाऱ्यावर येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने खाडीत मिळणारी, खास करून उरणच्या पाणजे परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर मिळणारी, ही मासळी कमी झाली आहे. यात निवटय़ा ज्या चिखलात बिळ करून राहतात. ही मासळी सध्या काही प्रमाणात तरी मिळत आहे. मात्र त्यांची संख्या कमी झाल्याने २०० रुपयांना २४ नग मिळत होते ते सध्या २५० ते ३०० रुपयांनी मिळू लागले असल्याचे निशांत पाटील यांनी सांगितले. तर खुबे जे शिंपल्यांच्या स्वरूपात असतात त्यांचीही संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र याच कालावधीत कोळंबीचे छोटे जीव असलेले कोळींब मात्र सध्या खाडीतून गायब झाले आहेत. खास करून या दिवसांत येथील महिला हे कोळींब पकडतात. त्याकरिता पहाटे अंधारातून जावे लागते.

पक्ष्यांच्या खाण्यावरही परिणाम

उरणच्या खाडीकिनाऱ्यावर खास करून परदेशातून येणारे देशी-विदेशी पक्षी हे कोळींब खाण्यासाठीच येतात. त्यांचीच संख्या घटल्याने याचा परिणाम पक्ष्यांच्या खाण्यावरही होण्याची शक्यता आहे.

कोळींबाचे कालवण तसेच वडय़ा हे खवय्यांचे खास आकर्षण आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात ही मासळी मिळत नसल्याने या दिवसात मिळणारे कोळींब त्याच्या वडय़ा करून त्या वाळवून नंतर पावसाळ्यात त्याचा वापर केला जातो. हे कोळींब खाडीतून सध्या गायब झाले आहे. यामुळे आमचा हंगामी व्यवसायही घटला आहे.   – सुशीला भोईर, मच्छीमार महिला