माघी गणेशोत्सवामुळे बोटी किनाऱ्यावर; बोंबील, मांदेली, वाकटय़ांच्या दरात वाढ

माघी गणेशोत्सवासाठी मासेमारी करणारे खलाशी (मजूर) घरी गेल्याने निम्म्यापेक्षा अधिक मच्छीमार बोटी किनाऱ्यावर विसावल्या आहेत. त्यामुळे दररोज बाजारात येणाऱ्या मासळीच्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी बोंबील, मांदेली, वाकटय़ा व मोठय़ा मासळीचेही दर वाढले आहेत. त्यामुळे ३० ते ४० टक्के दर वाढ झाल्याची माहिती मच्छीमारांनी दिली.

उरणमधील करंजा व मोरा ही दोन प्रमुख मासेमारी बंदरे आहेत. या दोन्ही बंदरांत तसेच उरण तालुक्यात मिळून एकूण ८००पेक्षा अधिक छोटय़ा व मोठय़ा मासेमारी बोटी आहेत. यामध्ये सहा सिलेंडरच्या मोठय़ा बोटींच्या साहाय्याने खोल समुद्रात मासेमारी केली जाते. या बोटींचे मालक (नाखवा) व मासेमारी करणारे मजूर (खलाशी) यांच्याकडून भागीदारीत मासेमारी केली जाते.

राज्यात मच्छीमारीवर अवलंबून असणाऱ्यांची मोठी असून १५ लाखांपेक्षा अधिकांना या व्यवसायातून रोजगार उपलब्ध होतो. दरवर्षी राज्यात एकूण ४ लाख ६७ हजार ४५८ मेट्रिक टन मासळीचे उत्पादन होत असून यापैकी परदेशात निर्यात होणाऱ्या मासळीच्या उत्पादनातून केंद्र सरकारला २ हजार ८०० कोटींचे परकीय चलन मिळते. असे असले तरी केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असून मच्छीमारांना अनुदान व सुविधा वेळेत मिळत नसल्याने मच्छीमार उपेक्षितच राहिले आहेत.

दर्यातील प्रदूषणाचेही संकट कायम

जमिनीवरील प्रदूषणाबरोबरच आता समुद्रातील प्रदूषणाचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच वाढती थंडी व अचानकपणे वाढणारे तापमान याचाही परिणाम होत असल्याची माहिती मच्छीमार व्यावसायिक विनायक पाटील यांनी दिली. या वेळी उरणमधील ४०० पेक्षा अधिक बोटीवरील खलाशी माघी गणेशोत्सवासाठी गावी गेल्यानेही मासेमारीवर परिणाम होऊन आवक घटली असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. हा सण संपल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने मासेमारीला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.