सिडकोमार्फत पुनर्वसन करण्याची २७ गावांच्या बैठकीत मागणी; संपादित व असंपादित सर्वच जागांचा मोबदला देण्याचा आग्रह

नवी मुंबई : शनिवार व रविवारी झालेल्या संततधार पावसाने विमानतळ प्रकल्पाशेजारील डुंगी गावाला पाण्याने वेढलेले असताना आता याच गावाच्या शेजारील पारगाव, भंगारपाडा, ओवळा व दापोली या चारही गावांनाही उलवा नदीच्या पुराचा धोका संभावत आहे. त्यामुळे सिडकोने या चार गावांचाही देखील सहानभूतीने विचार करावा अशा मागणी २७ गावांच्या बैठकीत बुधवारी करण्यात आली. डुंगी गावातील संपादित व असंपादित सर्वच जागेचा मोबदला देण्यात यावा असे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. २३ जुलै रोजी सिडको अधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे.

नवी मुंबई विमानतळासाठी दहा गावांची ६७१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य शासनाने या गावातील साडेतीन हजार ग्रामस्थांनी विमानतळ प्रकल्प वेगळा मोबदला दिला आहे. यात साडेबावीस टक्के योजनेतील विकसित भूखंडांचा समावेश आहे. त्याचबरोबर या ग्रामस्थांना नवीन विमानतळ कंपनीत भागभांडवल देखील देण्यात आले आहे. या दहा गावांच्या या पुर्नवसनानंतर प्रकल्पासाठी जमीन संपादित न करण्यात आलेले पण प्रकल्पबाधित होण्याची भीती असलेल्या गावांचा प्रश्न आता ऐरणीवर येत आहे. यात डुंगी या दोनशे हेक्टर जागेवरील गावात गेली तीन वर्षे पाणी भरत आहे. विमानतळासाठी लागणाऱ्या ११६० हेक्टर जमिनीवर सध्या सपाटीकरण करण्यात आले असून फेब्रुवारी २०१८ रोजी या विमानतळाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर आजूबाजूच्या गावात पाणी साचण्याचे प्रकार घडत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. विमानतळासाठी ९६ मीटर उंच उलवा टेकडी उत्खनन करून तिची उंची आठ मीटपर्यंत कमी करण्यात आली आहे. तेवढीच उंची या धावपट्टीची ठेवण्यात येणार असल्याने तेवढा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे या भरावामुळे आजूबाजूच्या काही गावात खोलगट भाग तयार झाला असून पावसाळ्याचे पाणी साचण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. शनिवारी रविवारी झालेल्या संततधार पावसामुळे डुंगी गाव पाच ते सहा फूट पाण्यात गेल्याने रहिवाशांचे हाल झाले होते. लहान मुले, महिला आणि वृद्धांची तारांबळ उडालेली होती. त्यामुळे या गावाचे इतरत्र पुनर्वसन करून विमानतळ प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेला मोबदला देण्यात यावा अशी मागणी वाढू लागली आहे. त्यासाठी बुधवारी २७ गावातील काही प्रमुख ग्रामस्थांची तसेच समाज व डुंगी ग्रामस्थांची बैठक होऊन मागण्याचा विचार करण्यात आला आहे. सिडको या गावातील ४६ घरांचे सर्वक्षण करण्यास तयार आहे पण ग्रामस्थ संपूर्ण गावठाण भागाचे सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी लावून धरत आहेत. डुंगी गावाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर या गावाच्या आजूबाजूला असलेली पारगाव, दापोली, भंगारपाडा व ओवळा या गावांनादेखील उलवा व गाढी नदीच्या पुराचा धोका वाटू लागला आहे. या नदींचे पात्र बदलण्यात आले असून भरतीचे पाणी या पात्रातून पुन्हा माघारी येण्याची भीती व्यक्त केली जात असून सिडकोने या नदीचा पूर चार गावात येण्याअगोदर या गावांचाही सहानुभूतीने विचार करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. २३ जुलैच्या बैठकीत ग्रामस्थ हा विषय मांडणार आहेत.

डुंगी गावातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे, पण हा धोका कायम आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचे अंदाज वर्तविले आहेत. त्यामुळे यानंतरही डुंगी गाव पाण्याखाली जाण्याची भीती आहे. १०० वर्षांत या भागात पाणी साचणार नाही असा अहवाल तयार करण्यात आला होता. अद्याप विमानतळ सुरू झालेले नसताना पाणी भरण्याची घटना दरवर्षी होत आहे. त्यामुळे सिडकोने या गावातील संपादित व असंपादित सर्व जागांना पर्यायी भूखंड देऊन विमानतळ प्रकल्पाप्रमाणे पुनर्वसन करावे अशी मागणी आजच्या २७ गाव बैठकीत करण्यात आली आहे. केवळ डुंगीलाच नाही तर आजूबाजूच्या चार गावांना देखील नदीच्या पुराचा धोका आहे.