‘जसे लोक तसे प्रशासन’ या उक्तीप्रमाणे सिडको प्रशासनाची कार्यपद्धती असल्याचे दिसत आहे. सोमवारी पाच दिवसांच्या गौरी गणपतींचे विसर्जन झाले तेव्हा विसर्जनाच्या प्रत्येक ठिकाणी सिडकोने निर्माल्य कलश ठेवले होते. या कलशामधील काही निर्माल्याचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यात आले तर काही ठिकाणी हे निर्माल्य रस्त्याच्या कडेला फेकण्यात आल्याने ‘ग्रीन गणेश’ ही संकल्पना यंदा कागदावरच राहिली आहे. यापूर्वी या निर्माल्याचे शास्त्रोक्त विघटन होत होते. कळंबोली, खारघर, खांदेश्वर, नवीन पनवेल आणि कामोठे या परिसरात सिडको प्रशासनाने विसर्जनासाठी निर्माल्य कलशाची सोय केली होती. या परिसरातील सार्वजनिक व खासगी अशा सुमारे दहा हजार गणेशमूर्ती सोमवारी विसर्जित झाल्या.
या सर्व मूर्तीसोबत आलेल्या निर्माल्याची विल्हेवाट दुसऱ्या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने सिडकोकडून केली जात असे. सिडकोचा आरोग्य विभाग याबाबत कचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराला तशी माहिती देत असे. जेवढे निर्माल्य तेवढय़ा लांबीरुंदीचा खड्डा करून त्यामध्ये हे निर्माल्य विघटनासाठी ठेवले जात असे. काही दिवसांनी त्यापासून खतनिर्मिती होत असे. हेच खत सिडको उद्यानांमध्ये वापरले जात होते. सिडकोच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली; परंतु आता सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी कचरा उचलण्याचे काम आरोग्य विभागाकडून काढून अभियांत्रिक विभागाकडे सोपविल्याने यंदा निर्माल्य विघटनाची शास्त्रोक्त पद्धत या विभागाच्या तज्ज्ञ अभियंत्यांच्या ध्यानात आली नाही. या अभियंत्यांनी कचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराला थेट आदेश देऊन हे निर्माल्य खाडीच्या पाण्यात सोडण्याचे आदेश दिले. या सर्व गोंधळामध्ये कोमजलेली शेकडो टन फुले खाडीत टाकण्यात आली. राज्य सरकारच्या उपक्रमामधील एक भाग असलेल्या सिडको प्रशासनाने केलेल्या या जलप्रदूषणाबाबत निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. किमान दहा दिवसांचे गणेश विसर्जनावेळी तरी सिडकोने या निर्माल्याची शास्त्रोक्त पद्धतीने विघटनाची सोय करावी अशी अपेक्षा निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे.