नेरुळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार; फार्मसिस्ट रजेवर असल्याचा परिणाम

नेरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील फार्मसिस्ट आठवडाभरापासून रजेवर असल्याने त्याचे काम तेथील मावशी म्हणजेच आया करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फार्मसिस्टला पर्यायी व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली नाही. मावशींना औषधांविषयी काहीच ज्ञान नसल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.

नेरुळ सेक्टर-७ येथे सात वर्षांपूर्वी महापालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले. हे केंद्र फेज-१ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी पोलिओ, लसीकरण बाह्य़रुग्ण विभागाची सोय आहे. सकाळी ९ ते १२.३० व दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत बाह्य़रुग्ण विभाग सुरू असतो. नेरुळ विभागाची लोकसंख्या सुमारे दोन लाखांच्या घरात आहे. त्यामुळे लोकसंख्येचा वाढता भार नेरुळ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पडत असल्याने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे वॉर्डबॉय, परिचारिका, आरोग्य अधिकारी, फार्मसिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सफाई कामगार, बहुउद्देशीय सेवक अशी पदे आहेत. रोज येथे १५० बाह्य़रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यांना औषधे देण्याचे काम मावशी करत आहेत. या पदासाठी बी. फार्म. किंवा डी. फार्म. झालेली व्यक्ती असणे आवश्यक आहे.

या प्रकाराबाबत चौकशी करून माहिती घेण्यात येईल. याविषयी अद्याप कोणीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे आमच्याकडे याची माहिती नाही, मात्र प्रत्यक्षात असे घडले असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

रमेश निकम, मुख्य वैद्यकीय अधिकारी.