हुंडा मागणाऱ्या नवरदेवासह त्याच्या नातलगांविरोधात गुन्हा दाखल करून रबाले पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
ऐरोलीमध्ये राहणाऱ्या एका मुलीचे लग्न वडाळा येथे राहणाऱ्या शैलेश गुप्ता याच्याशी ठरले होते. त्यासाठी वधूकडून वराला दोन लाख रूपये हुंडा देण्याचे ठरले होते. त्यानुसार मुलीच्या पित्याने वराला दोन लाख रुपये दिले. ऐरोली येथील प्रजापती कार्यालयात २९ जानेवारीला विवाह होणार होता. विवाहाचा सुरुवातीचा विधीही पार पडला. मात्र, बाकीच्या विधींआधी अचानक नवरदेव व त्याच्या नातेवाईकांनी आणखी एक लाख रुपयांची मागणी केली. ऐनवेळी ही मागणी पूर्ण करणे वधूच्या नातेवाईकांना शक्य नसल्याने दोन्ही पक्षांत बचाबाची झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.
नवरदेवाच्या काही नातेवाईकांनी वधूच्या मामाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी वधूच्या मामाने रबाले पोलीस ठाण्यात नवरदेव शैलश गुप्ता व त्याचे नातेवाईक दयांनद गुप्ता, प्रदीप गुप्ता, विनय गुप्ता, प्रभू गुप्ता यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार नवरदेवासह पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर यांनी दिली.