नवी मुंबई, पनवेल हा परिसर रहिवासाची प्रमुख शहरे म्हणून गणली जात असली तरी, या शहरांमध्ये अनेक मोठमोठय़ा बाजारपेठा कार्यरत आहेत. मुंबई शहरातील जागा अपुरी पडू लागल्यानंतर तेथील मोठमोठे बाजार नवी मुंबई परिसराकडे सरकू लागले. मोठमोठय़ा बाजारपेठांसह आणखीही काही वैशिष्टय़पूर्ण बाजार या शहरांत आहेत. अशाच बाजारांचा वेध घेणारे हे नवे पाक्षिक सदर..

कळंबोलीतील पोलाद बाजार हा देशातला सर्वात मोठा लोखंड बाजार आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. दळणवळणाच्या भविष्यातील अडचणींवर तोडगा म्हणून सुमारे ३० वर्षांपूर्वी हा बाजार सुरू करण्यात आला. सुरुवातीला ‘स्टील अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया’ आणि ‘टाटा स्टील’ या दोनच कंपन्यांची गोदामे येथे कार्यरत होती. हळूहळू मुंबईतील मशीद बंदर, घाटकोपर येथील लोखंडाच्या व्यापाऱ्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया येथे सुरू झाली. अगदी कागदी व्यवहार दूरध्वनीवर होईपर्यंत आणि दूरध्वनीचे व्यवहार ‘ऑनलाइन’ होइपर्यंतचा प्रवास कळंबोलीतील या पोलाद बाजाराच्या डोळय़ांसमोर घडला आहे.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
Baba Jumdev
विश्लेषण : विदर्भात एका ‘बाबां’बद्दल दुसऱ्या ‘बाबां’चे वादग्रस्त वक्तव्य… अनुयायांत संताप आणि भाजपला ताप!
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?

या लोखंड पोलाद व्यापारावर पूर्वी गुजराती समाजाचा पगडा होता. त्यामुळे व्यवहाराची पद्धत आजतागायत त्याच धाटणीची आहे. केवळ विश्वासावर येथे लाखोंचे व्यवहार होतात.  लोखंडाची गरज असलेल्या कंपन्यांच्या दारात परदेशी कंपन्या स्वस्त दरातील लोखंड पाठवू लागले. मात्र, कळंबोलीतील लोखंड व्यापाऱ्यांचा व्यवसाय तेथेच सुरू आहे. कित्येकदा एखादा माल वर्षांनुवर्षे एकाच जागेवर पडून राहतो. पण त्यातील एखादी गोष्ट चोरीस जात नाही किंवा तिचा अपहार होत नाही, असे येथील जाणकार सांगतात.

सरकारने लोखंडाचा व्यापार करणाऱ्यांसाठी कळंबोलीतील पोलाद मार्केटमध्ये १९६० गोदामांचे गाळे उपलब्ध करून दिले होते.  मुंबईहून व्यापार करण्याऐवजी कळंबोली येथे व्यापारी संकुल उभारून लोखंडाचे व्यवहार तेथून घडवून आणण्याचे यामागे नियोजन होते. सुरुवातीच्या काळात कळंबोली येथील स्टील अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया या सरकारी गोदामात लोखंड माल मोठय़ा प्रमाणात येत होता. त्यावेळी माथाडी कामगार कमी होते. त्यामुळे लोखंड मंडळातील नोंदणीकृत असणाऱ्या माथाडी कामगारांचे चांगले दिवस होते. कालांतराने जागतिकीकरणामुळे परदेशी कंपन्यांच्या स्वस्तदराच्या लोखंडामुळे (लोखंडी कॉईल, सळ्या, प्लेट) मोठय़ा कंपन्यांनी भारतीय बनावटीचे लोखंड कंपन्यांना बगल देऊन परदेशी कंपनीकडून थेट विक्री सुरू केली. अनेकांनी कळंबोली येथील स्टील अ‍ॅथोरिटीला बगल देत कारखान्यात लोखंडी माल मागविण्यास सुरुवात केली. त्यामुळे कळंबोली स्टील अ‍ॅथोरिटी कंपनीचे (स्टीलयार्ड) काम कमी झाले. आजचे बिमा व डीस्मा कॉम्पलेक्स हे याच लोखंड-पोलाद व्यापाऱ्यांचे हक्काचे संकुल येथे दिखामदार पद्धतीने उभे आहे. मात्र, येथील गोदामांचा वापर लोखंडाऐवजी इतर माल ठेवण्यासाठी केला जात आहे.

सरकारने त्यावेळी व्यापाऱ्यांप्रमाणे लोखंडाचा माल उचलणाऱ्या कष्टकरी माथाडी कामगारांच्या राहण्याचा विचार करून सिडको प्रशासनाच्या कळंबोली वसाहतीमध्ये बैठय़ा घरांची योजना आखली. त्यामुळे या वसाहतीमध्ये मोठय़ा प्रमाणात बैठय़ा घरांची रचना (केएलवन व एलआयजी) अशी केली आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील लोकांना घर खरेदी करता यावे यासाठी हे धोरण त्यावेळच्या सरकारने आखले होते. आजही कळंबोलीमध्ये कुटुंबांसहीत राहणाऱ्या माथाडी कामगारांचा रोजचा दिवस याच लोखंडाच्या व्यवहारावर आपले पोट भरतो. सुमारे अडीच हजाराहून अधिक माथाडी कामगार या लोखंड बाजारात हमालीचे काम करतात. सध्या आर्थिक मंदीच्या लाटेतही हे कामगार कधी डगमगले नाहीत. कामासाठी या माथाडी कामगारांना गणवेश नाही. हाफ खाकी चड्डी, आणि अंगात एक साधा टीशर्ट आणि खांद्यावर एक लाल किंवा भगव्या रंगाचा गमछा. असा गणवेश या माथाडी कामगारांचा आहे.

लोखंडी प्लेटची गोलाकार वर्तुळात बांधून त्या कॉईलची विक्री केली जाते. त्याचप्रमाणे लोखंडी प्लेट, अ‍ॅंगल व इतर असे हे लोखंडातील प्रकार आहेत. प्रत्येक मालाच्या प्रकारावर हा माल उचलण्यासाठी किती दर लागेल याची वजनाच्या टनावर दरआकारणी सरकारच्या लोखंड पोलाद मंडळाने करून दिली आहे. मेहतांनी सांगितलेला लोखंडी माल उलचून ट्रक किंवा ट्रेलरमध्ये ठेवण्यासाठी माथाडी कामगारांसोबत मोठे क्रेन किंवा हायड्रा असेही यंत्र लागतात. त्याचाही दर वेगळा लागतो. अशा विविध दरांपुरता व मालाची उचलठेव करण्यासाठी या माथाडी कामगारांचा उपयोग केला जातो. मेहता हे व्यापाऱ्यांनी नेमलेले नोकरदार आहेत. हा या धंद्यातील तिसरा महत्त्वाचा घटक. मात्र हाच मेहता मोठय़ा इमानीने व्यापारी रोज सकाळी निर्देश देईल तेवढा माल गोदामामधून ट्रकमध्ये माथाडी कामगारांच्या साह्य़ाने भरतो. मालाच्या दराची माहिती काही प्रमाणात दलालाला असते. दलाल हा चौथा घटक आहे. मात्र हा दलालही मेहता एवढा प्रामाणिक असल्याने हा माल परस्पर विकण्याची शक्यता नसते. माल एका गोदामामधून इतर गोदामात किंवा कारखान्यांना पुरविण्यासाठी या बाजारात वाहतूकदारांचे ट्रक रस्त्यावर उभे दिसतात. यामुळे या व्यवहारातील मोठा विश्वासू घटक असलेल्या या वाहतूकदाराचे पोटही याच व्यवहारावर अवलंबून आहे.