वारंवार बत्ती गूल, खराब विद्युत उपकरणं, उघडय़ा वायर्स, जीर्ण वाहिन्या

पारा पस्तीशीपार गेला असतानाच महावितरणच्या कारभारामुळे नवी मुंबईतील कोपरखरणे व घणसोली करांची वारंवार खंडित वीज पुरवठयामुळे काहीली होत आहे. आज घणसोलीत तर तब्बल ७ तास विद्युतपुरवठा बंद होता.  तर कोपरखरणेत वीज गेली नाही असा दिवस उजाडत नाही.

नवी मुंबईत एखाद्या खेडेगावालाही लाजवेल अशी विजेची समस्या कोपरखैरणे नोडमध्ये आहे. दिवसभरातून एक वेळा तरी विद्युतपुरवठा खंडित होतो. ही समस्या सोडविण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न वितरण व्यवस्थेच्या उदासीनतेने व्यर्थ गेले आहेत. अशाच पद्धतीचा कारभार घणसोली नोडचा आहे. तेथेही तीन महिन्यांपूर्वी नवीन बसवलेले विद्युत रोहित्र नादुरुस्त झाले होते.

सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला हा नोड आहे. शंभर टक्के विद्युत देयक वसुली होते, मात्र खंडित वीजपुरवठा ही समस्या सुटत नाही. अनेक वर्षांपासून येथील रहिवासी या समस्येला तोंड देत आहेत. विद्युत उपकरणे खराब होणे, उघडय़ा वायर्स, जीर्ण वाहिन्या, निकृष्ट साहित्य यामुळे ही समस्या कायम आहे.

गावठाणसह काही नोडला एमआयडीसी विभागातून विद्युतपुरवठा होतो. त्यामुळे दर शुक्रवारी एमआयडीसीतील भारनियमनाचा सामना या नागरीवस्तीला करावा लागतो.

काही आठवडय़ापूर्वी कोपरखैरणे सेक्टर १९ ए मधील विद्युत रोहित्र जळाल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला होता. नवीन बसवल्यानंतर अध्र्या तासातच हे विद्युत रोहित्र  नादुरुस्त झाल्याने रात्रभर परिसरात बत्ती गुल झाली होती. अशाच पद्धतीचा कारभार घणसोली नोडचा आहे. तेथेही तीन महिन्यांपूर्वी नवीन बसवलेले विद्युत रोहित्र नादुरुस्त झाले होते.

ही समस्या माजी मंत्र्यांच्या गावातही होती. मंत्र्यांनी स्वत: लक्ष घातल्याने तेथील समस्या सुटली. मात्र कोपरखैरणे सेक्टर १९ ए,सी, १६,१७,१८ एक ते पाचमध्ये अद्यापही खंडित वीजपुरवठय़ाचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे.

आमदारांच्या इशाऱ्यानंतरही हालचाल नाही

२७ सप्टेंबर रोजी सलग आठ तास विद्युतपुरवठा खंडित झाला होता त्या वेळीही लोकसत्ताने ‘कोपरखैरणेत पुन्हा काहिली’ मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत आमदार संदीप नाईक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत नवी मुंबईकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, कामे करा अन्यथा मोठे जनआंदोलन उभारू असा इशाराही दिला होता. या वेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना कोपरखैरणे भागात ट्रान्सफार्मर आणि इतर उपकरणे दुय्यम दर्जाची बसविली आहेत, अशी माहिती मिळाल्याचे स्पस्ट केले होते. मात्र त्यानंतरही महावितरणाच्या कामात कुठेही सकारात्मकता दिसून आली नाही.

महावितरण लोकप्रतिनिधींच्या निवेदनाला कचऱ्याची टोपली दाखवतात, तेथे सामान्य जनांचे काय? मी स्वत: येथील लोकप्रतिनिधींनी काढलेल्या किमान तीन मोर्चामध्ये सहभागी होतो. मात्र परिणाम शून्य.

– बाळासाहेब शिंदे, रहिवासी सेक्टर १७ कोपरखरणे

कोपरखैरणे नोडमध्ये समस्या आहेत. येत्या काही दिवसांत त्यावर ठोस तोडगा काढला जाईल. शिवाय दीर्घकालीन उपाययोजनाही कार्यान्वित केल्या जातील.

– प्रवीण अन्नछत्रे, कार्यकारी अभियंता, वाशी विभाग