नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे वाशी येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेले विष्णुदास भावे नाटय़गृह असताना केवळ भव्य जयंती महोत्सव करण्याच्या हव्यासापोटी सिडकोच्या वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील प्रदर्शन केंद्रात आयोजित केलेला चारदिवसीय जयंती कार्यक्रमाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी गर्दी जमविण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना आणून बसविण्यात आले. केवळ मराठी भाषेतून असलेली व्याख्यान, एका समाजापुरते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मर्यादित असल्याची समजूत, बौद्धिकांमधून बाबासाहेब ऐकण्याची नसलेली सवय अशी कारणे समोर येत आहेत.
महापौर सुधाकर सोनावणे यांनी या वर्षीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती मोठय़ा उत्साहात आणि भव्य करण्याचे ठरविले होते. बाबासाहेबांचे अर्थविषक विचार, नदी जोडण्याचा त्या वेळी त्यांनी केलेला प्रयत्न, महिला सक्षमीकरणाचे कार्य, साहित्यसंपदा यावर सखोल चिंतन मांडणाऱ्या व्याख्यात्यांचे कार्यक्रम वाशी रेल्वे स्थानकाबोहरील सिडकोच्या भव्य प्रदर्शन केंद्रात झाले. याच वेळी देशातील विविध कलाकारांच्या १२५ कलाकृती, काही मिनिटांत तयार होणारी बाबांची शिल्पाकृती यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते; मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
सिडकोने २०० कोटी रुपये खर्चून बांधलेले हे प्रदर्शन केंद्र सध्या पांढरा हत्ती म्हणून पोसले जात आहे. सिडकोचे काही कार्यक्रम, बिल्डर संघटनेचे प्रदर्शन, आणि काही लग्नसोहळे यांच्यापुरते हे भव्य सभागृह मर्यादित राहिले असून तेथील देखभाल दुरुस्ती सिडकोच्या अंगावर पडू लागली आहे. दर्दी प्रेक्षकांची गर्दी जमविणेदेखील या ठिकाणी कठीण जास्त असल्याने पाच ते सहा हजार प्रेक्षक संख्या असलेल्या या सभागृहात पाचशे-सहाशे प्रेक्षक म्हणजे खूप तुरळक वाटत असल्याचे दिसून येते. तोच प्रकार पालिकेने ११ एप्रिल ते १४ एप्रिलदरम्यान आयोजित केलेल्या महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात पहिल्या दिवशी हजार एक श्रोत्यानंतर ही संख्या रोडावत गेली. शेवटच्या जयंती दिवशी तर पालिकेला आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांची मदत घ्यावी लागली. त्यामुळे इतका मोठा कार्यक्रम आयोजित करून दर्दी प्रेक्षक न आल्याने पालिकेतील काही पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला. नवी मुंबई एक अठरापगड जातीचे शहर असून देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्यामुळे एका प्रकारे हे शहर छोटा भारत म्हणून ओळखले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा देशातील प्रत्येक नागरिक या ठिकाणी असताना पालिकेने आयोजित केलेला कार्यक्रम हा केवळ मराठी भाषेतून होते. त्यात बौद्धिक पातळीतून बाबासाहेब आंबेडकर ऐकणाऱ्यांची संख्या कमी असल्याने ते बाबासाहेबांना गाणी आणि कवाली यातून शोधत होते. या कार्यक्रमांची विविध भाषांतून जाहिरात करण्यास पालिका कमी पडल्यानेही ही उपस्थिती कमी असल्याची चर्चा आहे.