महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शाब्दिक प्रहार

नवी मुंबई :  नवी मुंबई पालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता गृहीत धरून गेली २५ वर्षे पालिकेची सत्ता हातात ठेवणाऱ्या आमदार गणेश नाईक यांना चारही बाजूने घेरण्याची व्यूहरचना महाविकास आघाडीच्या तीन घटकपक्षांनी आखली आहे.  त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जीतेंद्र आव्हाड व शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी नाईकांवर शाब्दिक प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या वतीने या रणनीतीत स्थानिक अध्यक्ष अनिल कौशिक व संतोष शेट्टी हे मैदानात उतरणार आहेत.

नवी मुंबई पालिकेची प्रारूप मतदार यादी २६ फेबुवारी रोजी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून संपर्क कार्यालये उघडण्याची सपाटा लावला आहे. या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनांसाठी महाविकास आघाडीचे नेते नवी मुबंईत येत असून त्यांच्या भाषणाचा रोख हा सर्व नाईक यांच्या कारभारावर आहे. जितेंद्र आव्हाड यांनी तर दिघ्यात मतदारांना नाईकांच्या हातातील घोडा होऊ नका असा सल्ला दिला आहे. काही दिवसांपासून समाजामाध्यमांवर नाईकांचा एक जुनी चित्रफीत प्रसारित होत असून ते घोडा घेऊन फिरत असल्याचे दिसून येत आहे. तोच संदर्भ आव्हाड यांनी दिला आहे. तुर्भे येथील एका कार्यक्रमात नाहटा यांनी नाईकांचा ‘मी फाइव्ह’ असा उल्लेख केला असून मागील निवडणुकीतील प्रचार कायम ठेवला आहे. नाईकांच्या घराणेशाहीवर देखील नाहटा यांनी टीका केली आहे. नाईकांनीही याच भागात झालेल्या एका कार्यक्रमात तुर्भे येथील गुंडगिरीला घाबरायचे नाही असा विश्वास देताना आपल्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुंड चांगल्या प्रकारे ओळखतात असे सांगितले. नवी मुंबईत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत असली तरी नाईक हे आता भाजपाचे पाईक असल्याने ही लढत महाविकास आघाडी विरुद्ध नाईक अशी असल्याने नाईकविरोधक सर्व नेते येत्या काळात नाईकांवर चांगलेच घसरणार असल्याचे दिसून येते.