सिमेंटचे जंगल निर्माण करणारी संस्था म्हणून ओळख असणाऱ्या सिडकोने नागरिकांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. गेल्या वर्षी सुरू केलेल्या मनपरिवर्तन या उपक्रमांर्तगत तरुणांना ध्यानधारणेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. त्यासाठी १५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार ते साठेआठ या कालावधीत वाशी येथील प्रदर्शन केंद्रात वेलनेस अ‍ॅण्ड स्पिरिच्युअल युथ फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. या आध्यात्मिक महोत्सवाला दहा हजार तरुण तरुणी उपस्थित राहतील, असा आशावाद सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी पत्रकार परिषेदेत व्यक्त केला.
शहर स्मार्ट करण्याअगोदर येथील नागरिक स्मार्ट होणे आवश्यक आहे असे मत व्यक्त करून भाटिया यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. तरुण पिढीत सहनशीलतेचा अभाव असून केवळ फेसबुक अथवा व्हॉट्स अ‍ॅपवर टाकलेल्या पोस्टवर एखादे लाइक न आल्यास निराश होणारी पिढी तयार होत आहे. त्यांच्यामध्ये आध्यात्मिक जागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सिडकोच्या दक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
चार तास चालणाऱ्या या युवा महोत्सवात भाटिया स्वत: हार्टफूलनेस ध्यानधारणेचे तंत्र सांगणार असून ३५ मिनिटांची ध्यानधारणा केली जाणार आहे. त्यानंतर तळवलकर फिटनेस सेंटरतर्फे झुब्बा डान्सचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार असून डीजे पेरिर रवाण याच्या ९० मिनिटांच्या आध्यात्मिक संगीतावर ध्यान केले जाणार आहे.
आजच्या तरुण पिढीला नृत्य, संगीत याद्वारे आध्यात्म सांगितल्यास ते लवकर पचनी पडते असे स्पष्ट करून तरुण पिढी ज्ञानसंपन्न असली तरी त्यांना उदासीनता, दु:ख, तणाव, भावनिक अस्वस्थेने ग्रासले असल्याने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात सिडकोने पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
यासाठी शहरात कायमस्वरूपी केंद्र उभारण्याचा विचार केला जाणार असल्याचे ते म्हणाले. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सिडकोच्या जनसंपर्क अथवा सामाजिक सेवा विभागाशी ९८७०११६२१८, ९९६९२७९०७५ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.