राष्ट्रवादी ४८ नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी दाद मागणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांचा बुधवारी भाजपमध्ये रीतसर प्रवेश झाल्यानंतर नवी मुंबई पालिकेत एक विचित्र राजकीय स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे ४३ व अपक्ष ५ आशा ४८ नगरसेवकांनी आपला वेगळा गट स्थापन केल्याने त्यांनी नाईक यांच्या सोबत भाजपचे कमळ हाती घेतले असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडे पाच नगरसेवक असल्याचे जाहीर केले आहे आणि चार नगरसेवकांनी अलिप्त राहणे पसंत केले आहे. नाईक यांनी त्यांना कुंपणावर ठेवले आहे. यात महापौर जयवंत सुतार यांचा समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले सुतार आजही महापौर पदावर कायम असल्याने अल्पमतात असलेल्या राष्ट्रवादीचा महापौर आणि ४८ नगरसेवक भाजपमध्ये गेल्याने सत्ता भाजपची असे चित्र निर्माण झाले आहे.

भाजपचे अगोदर सहा नगरसेवक असल्याने पालिकेतील भाजपचे संख्याबळ ५४ झाले आहे. ४८ नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केलेला आहे. त्यांना पालिका सभागृहात भाजपचे सदस्य म्हणून अद्याप संमती न मिळाल्याने शुक्रवारी झालेल्या आचारसंहिता पूर्व सर्वसाधारण सभेत हा गट वेगळा न बसता पूर्वीच्याच आसनावर बसलेला दिसून आला. पूर्वीच्या ५७ नगरसेवकांच्या गटातून हे ४८ नगरसेवक फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस या ४८ नगरसेवकांच्या फुटीवर कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार आहे.

रविवारी नवी मुंबईत येणारे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. २०१५ मध्ये पालिकेत सत्ता स्थापन करताना नाईक यांनी या गटाची वेगळी मोट बांधून नोंदणी केलेली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांना कल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे पाच अपक्ष नगरसेवकांना आज फुटता येत नाही. शिवसेना या सर्व हालचालीवर लक्ष ठेवून आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पालिकेत सत्ता परिवर्तनचे राजकारण खेळले जाईल, पण ते प्रत्यक्षात येणे अवघड आहे. शिवसेनेचे पालिकेत ३८ नगरसेवक आहेत. काँग्रेसच्या दहा नगरसेवकांनी शिवसेनेला छुपा पाठिंबा दिल्यास ही संख्या ४८ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. बहुमतासाठी ५७ नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे शिवसेनेला आणखी ९ नगरसेवकांची गरज पडणार आहे. नाईक यांची मर्जी टिकवण्यासाठी ४८ नगरसेवक भाजपमध्ये जाण्यास तयार आहेत, पण विधानसभा निवडणूक झाल्यानंतर या ४८ नगरसेवकांपैकी दहा ते बारा नगरसेवक फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढणार आहे. सध्या भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांना जास्तीत जास्त आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शिवसेना करणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर  शहरातील राजकारण ढवळून निघणार असल्याचे दिसून येते.