‘उद्यान व्हिजन’अंतर्गत सुशोभित केलेली उद्याने महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने ओसाड

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तब्बल १९९ उद्याने आहेत. प्रत्येक नोडमध्ये उद्यान असून काही उद्यानांचे ‘उद्यान व्हिजन’अंतर्गत सुशोभीकरणही करण्यात आले आहे, मात्र कोटय़वधी रुपये खर्च झालेल्या या उद्यानांची देखभालीअभावी ‘शोभा’ होण्याची वेळ आली आहे. मोडतोड झालेल्या खेळण्यांमुळे सुटीच्या काळात खेळायचे कुठे असा प्रश्न मुलांना पडत आहे.

नवी मुंबईचे नियोजन करताना पुरेशा मोकळ्या जागा सोडण्यात आल्या. त्यावर उद्याने विकसित करण्यात आली, मात्र आज या उद्यानांत सुरक्षारक्षक नाहीत. मद्यपी आणि जुगाऱ्यांचे अड्डे तिथे जमलेले दिसतात. सध्या शाळांच्या सुट्टय़ांचे दिवस असल्याने उद्यानांत येणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढले आहे, मात्र तेथील मोडतोड झालेली खेळणी पाहून मुलांचा विरस होतो आणि पालकांच्या चिंतेत भर पडते. उद्यानांमध्ये केवळ लहान मुलांना खेण्याची परवानगी आहे. मोठय़ांसाठी क्रीडांगणे आहेत, मात्र नवी मुंबईतील बहुतेक उद्यानांत मोठी मुले खेळताना दिसतात. त्यामुळे व्यायामासाठी येणाऱ्यांना आणि लहान मुलांना त्रास होतो.

अनेक उद्यानांतील विजेचे दिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारा पसरतो. त्याचा फायदा घेऊन मद्यपी आणि जुगारी तिथे अड्डा जमवत आहेत.

लहान मुलांच्या खेळाच्या साहित्यावर मोठी मुले बसतात. त्यामुळे त्याचीही मोडतोड झाली आहे. पाणपोई वा शौचालयांची व्यवस्था नाही. कचराकुंडय़ा नाहीत आणि जिथे आहेत, तिथे तुटलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे कचरा इतस्तत: पसरलेला दिसतो. सुरक्षा रक्षक नसल्यामुळे उद्यानांची लोखंडी ग्रिल्स चोरीला गेला आहेत. आसनेही मोडली आहेत.

दिघा येथील साने गुरुजी बालोद्यानात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे बच्चे कंपनीला त्रास सहन करावा लागतो. ऐरोली सेक्टर तीनमधील राजीव गांधी उद्यानामध्ये मुले फुटबॉल किंवा क्रिकेट खेळत असल्यामुळे उद्यानामध्ये येणाऱ्या माहिलांना त्रास सहन करावा लागतो. तर रात्रीच्या वेळी या उद्यानामध्ये प्रेमीयुगुल अंधाराचा फायदा घेत अश्लील चाळे करत बसलेले असतात.

पालिकेचे उद्यान विभागाचे उपआयुक्त तुषार पवार यांच्याशी संपर्क साधला असता काही उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षक नसल्यामुळे त्यांची दुर्दशा झाली असल्याचे त्यांनी मान्य केले. शहारातील सर्व उद्यानांची पाहणी करून योग्य उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुठे झोपडय़ा.. कुठे दारूडय़ांचा अड्डा..

ऐरोली

ऐरोली सेक्टर १७ मधील रामदास बापू पाटील उद्यानाच्या बाजूला सिडकोच्या भूखंडावर बेकायदा झोपडय़ा बांधण्यात आल्या आहेत. या झोपडय़ांतील रहिवासी उद्यानात खाण्याचे पदार्थ टाकून जातात. उद्यानामध्ये पिण्याच्या पाण्याची सोयदेखील नाही. खेळण्याचे साहित्य तुटले आहे. शौचालयाचे दरवाजे तुटले असून साफसफाई करण्यात येत नसल्यामुळे दरुगधी पसरली आहे. उद्यानात दारूडय़ांचा अड्डा जमतो.

कोपरखरणे

येथील शिवाजी पाटील उद्यानामध्ये खुली व्यायामशाळा सुरू करण्यात आली होती, पण देखभालीअभावी तिची दुर्दशा झाली आहे. रॉक गार्डनमध्ये बसवण्यात आलेल्या शोभेच्या वस्तू तसेच प्राणी यांची मोडतोड झाली आहे. सेक्टर तीनमधील चिकणेश्वर उद्यानातील वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. कोपरखरणे येथील अण्णासाहेब पाटील उद्यानात खेळाच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. आसने मोडकळीस आली आहेत.

बेलापूर

बेलापूर गावामध्ये महापालिकेचे उद्यान आहे, मात्र त्याची दुर्दशा झाली आहे. उद्यानाचे प्रवेशद्वार तुटले आहे. प्रवेशद्वारासमोरच वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. बेलापूर कोळीवाडय़ातील उद्यानांमधील खेळाचे साहित्य, बाक तुटले आहेत. या ठिकाणी रात्री मद्यपान सुरू असते, असे परिसरातील रहिवासी नम्रता पाटील यांनी सांगितले.