नवी मुंबईत आमदाराच्या वाहनाची काच फोडली; कार्यकर्त्यांची धक्काबुक्की

नवी मुंबई नवी मुंबई महापालिकेने ऐरोलीत उभारलेल्या बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार येण्याची वाट न पाहता महापौर, आमदारांनी फीत कापल्याच्या मुद्दय़ावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांत शुक्रवारी जोरदार शाब्दिक चकमक आणि बाचाबाची झाली. या वादादरम्यान आमदार संदीप नाईक यांच्या वाहनाची काच फोडल्याने तणावात भर पडली. या घटनेनंतर ऐरोलीसह संपूर्ण नवी मुंबईत तणावाची परिस्थिती होती.

ऐरोली येथील नगरसेवक करण मढवी यांच्या प्रभागात उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन शुक्रवारी होणार होते. या कार्यक्रमाला महापौर जयवंत, सुतार, खासदार राजन विचारे, आमदार संदीप नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. परंतु, नियोजित वेळेत खासदार न आल्याने महापौर व आमदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याचा राग आल्याने शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जाहीर टीका केली. कार्यक्रमात दीप प्रज्वलन सुरू असतानाच सुरू झालेल्या या शाब्दिक चकमकीचे रूपांतर क्षणात धक्काबुक्कीत झाले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. यावेळी काही कार्यकर्त्यांत हाणामारी व शिविगाळही झाली. या घटनेनंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणालाही अटक व ताब्यात घेण्यात आले नव्हते.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी नगरसेविका विनया मढवी यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. खासदार येत असल्याचे सांगूनही कार्यक्रम सुरू करण्यात आला. हे शिष्टाचाराचे उल्लंघन आहे, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी केला.

तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसनेही पत्रकार परिषद घेत, शिवसेनेचे एम. के. मढवी, त्यांच्या नगरसेविका पत्नी व नगरसेवक पुत्राला अटक करण्याची मागणी केली. मढवी व त्यांच्या गुंडांनी आमदारांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास नवी मुंबईत उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला.