नेरुळ सेक्टर ८ मधील रेल्वे पादचारी पूल बंद; नूतनीकरणाचा मुद्दा अधांतरीच

नवी मुंबई : धोकादायक असल्याने नेरुळ सेक्टर ८ येथील रेल्वे पादचारी पूल वापरासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना पूर्व-पश्चिम ये-जा करण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यातच या पुलाच्या नूतनीकरणासाठी निर्णय होत नसल्याने आणखी किती दिवस ही पायपीट करावी लागणार असा सवाल पादचारी करीत आहेत.

नेरुळ रेल्वेस्थानक ते राजीव गांधी उड्डाणपूल यांच्या दरम्यान हा पादचारी रेल्वे पूल सिडको व रेल्वेने २५ वर्षांपूर्वी बांधला आहे. दोन महिन्यांपूर्वी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळल्यानंतर पालिकेने खासगी कंपनीकडून नेरुळमधील पुलाची संरचना तपासणी केली. या तपासणीत पूल धोकादायक असल्याचे निश्चित झाले आहे. पालिका आयुक्त, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या पाहणीतही पूल धोकादायक असल्याचे आढळल्याने  तो वापरासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.   हा पूल बंद केल्याने या पुलावरून दररोज प्रवास करणाऱ्यांची गैरसोय झाली आहे. संपूर्ण नेरुळ परिसरात पूर्व-पश्चिम ये-जा करण्यासाठी तीन पूल आहेत. त्यापैकी एक पूल रेल्वे स्थानकातील असून आणखी एक पूल राजीव गांधी उड्डाणपूल येथे आहे. सेक्टर ८ येथील पूल बंद करण्यात आल्याने या परिसरात राहणाऱ्या पादचाऱ्यांना रेल्वे स्थानक किंवा राजीव गांधी उड्डाणपुलापर्यंत पायपीट करावी लागते. ही पायपीट वाचवण्यासाठी अनके प्रवासी जीव धोक्यात घालून रूळ ओलांडतात. विशेष म्हणजे, नेरूळ बसस्थानकापासून जवळ असल्याने या पुलाचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत होता. मात्र, आता तो बंद झाल्याने बसस्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोय होत आहे.

दरम्यान, पालिकेने हा पूल धोकादायक ठरवून बंद केला असला तरी, त्याच्या नूतनीकरणाबाबत मात्र अद्याप पावले उचलण्यात आलेली नाहीत. यासंदर्भात रेल्वेचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांच्याकडे विचारणा केली असता, रेल्वेच्या अभियंता विभागाकडून पादचारी पुलाची सविस्तर माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल, असे उत्तर त्यांनी दिले.  मात्र, सिडकोच्या रेल्वे प्रकल्पाचे मुख्य अभियंता एस.के.चौटालिया यांनी ‘ पूल रेल्वेने निर्माण केला असून याची माहिती रेल्वेला पत्राद्वारे दिली होती. परंतू रेल्वे दुर्लक्ष करत आहे,’असा आरोप केला.

संरचना तपासणीत पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे.  त्यामुळे तो वापरासाठी बंद करण्यात आला आहे. सध्या तो रेल्वे व सिडकोच्या ताब्यात आहे. या दोन्ही प्राधिकारणांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पुलाची नव्याने निर्मिती करण्यासाठी पालिका मदत करेल.

-डॉ.रामास्वामी एन., आयुक्त, महापालिका