तिजोरीत केवळ चार लाखांचीच अतिरिक्त भर
मंगळवारी मोठा गाजावाजा करून साजरा करण्यात आलेला नवी मुंबई पालिका परिवहनचा बसदिन हा उपक्रम ‘पंक्चर’ झाला. ताफ्यातील सर्व बसगाडय़ा रस्त्यावर उतरवूनही ‘एनएमएमटी’च्या तिजोरीत रोजच्या उत्पन्नापेक्षा केवळ चार लाखांचीच अतिरिक्त भर पडली आहे. नवी मुंबई शहराची भौगोलिक रचना ही सरळ रेषेत असल्याने इच्छा असूनदेखील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करता आला नाही. त्यामुळे नवी मुंबईत मंगळवारी दररोज निघणाऱ्या ९५ टक्के वाहने रस्त्यावर उतरली होती. शहरातील नागरिकांची असलेली उदासीनता हे एक कारणही या चावी छोडो उपक्रम प्लॉप होण्यामागे असल्याची चर्चा आहे.
२० वर्षांपूर्वी शहरवासीयांच्या सेवेसाठी सुरू झालेल्या एनएमएमटीने प्रथमच वर्धापन दिनाव्यतिरिक्त एखाद्या नवीन कार्यक्रमाचे आयोजन बस डेच्या निमित्ताने केले होते. त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ३६५ बसेस रस्यावर उतरवूनदेखील पालिकेच्या तिजोरीत ३३ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा होऊ शकली नाही. इतर दिवशी ही रक्कम २८ ते २९ लाखांपर्यंत जमा होत असल्याचे परिवहन उपक्रमाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. पर्यावरण, आर्थिक बचत आणि सार्वजनिक सेवेचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी एनएमएमटी उपक्रमाने मंगळवारी एक दिवसाचा बस डे साजरा केला, मोठय़ा धूमधडाक्यात या उपक्रमाची कोपरखैरणे आगारातून सुरुवात करण्यात आली. त्यामुळे वीस वर्षांत कधीही एनएमएमटी बसची पायरी न चढलेल्या स्थानिक नेत्यांनीदेखील या निमित्ताने सार्वजनिक सेवेतून थोडाफार प्रवास केला. गेली पंधरा दिवस एका गाडीला सजवून शहरात फिरवले जात होते. खासगी वाहने एक दिवस घरी ठेवून सार्वजनिक सेवेचा वापर करण्याचा संदेश या बसद्वारे दिला जात होता. त्यासाठी २४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यातील १५ लाख रुपये खर्च केले जातील, असे आश्वासन सभापती साबू डॅनियल यांच्या वतीने दिले गेले होते. या बस दिनाला काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनीही विरोध केला. त्यामुळे या बस दिनावर झालेला खर्चही एनएमएमटीला कमवता आलेला नाही, अशी चर्चा आहे. नवी मुंबई शहराची रचना ही पारसिक डोंगररांगा आणि ठाणे खाडीमधील एका शंभर किलोमीटरच्या बेटावर झाली आहे. त्यामुळे ती एका सरळ रेषेत झाल्याने ऐरोली येथून बेलापूरला जाण्यासाठी नवी मुंबईकराला खासगी वाहन असल्यास ते बाहेर काढण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. त्यामुळे कामानिमित्ताने नवी मुंबईत दुचाकी व चारचाकी वाहने घेण्याऱ्यांची संख्या जास्त आहे. या उपक्रमात पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या वाहनांचा वापर करून हरताळ फासल्याचे दिसून येत होते. नवी मंबई पालिका परिवहन उपक्रमांत असलेल्या ३६५ बसगाडय़ा रस्त्यावर उतरविण्यात आल्या ही एक जमेची बाजू आहे. इतर दिवशी यातील ३० ते ४० बसेस या तुर्भे येथील आगारात उभ्या असल्याचे दिसून येते. बंगळुरूनंतर सर्वाधिक व्होल्वो बस नवी मुंबईत असून लवकरच हरित प्रवासासाठी दोन कोटी रुपये खर्चाची हायब्रीड बस ताफ्यात येणार आहे. आर्थिक डबघाईस जाणारा उपक्रम विविध प्रयत्नांतून फायद्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.