नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी शहरात ‘हवा गुणवत्ता केंद्रे’ उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र गेले आठ महिने कोपरखैरणे आणि तुर्भे कचराभूमी जवळील केंद्रे दुरुस्तीसाठी बंद आहेत. केंद्रांच्या दुरुस्ती-देखभालीसाठी अनेकदा निविदा काढूनही ठेकेदार मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

शहर तापमानात आणि हवामानातील अचूकता  दर्शविण्यासाठी याशिवाय  वातावरणातील हवेची गुणवत्ता नोंदी टिपण्याकरिता शहरात  विविध ठिकाणी हवा गुणवत्ता केंद्र उभारण्यात आली आहेत.  हवेत होणारे प्रदूषण, हवेतील वायूंचे प्रमाण विशेषत: ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साईड, नायट्रोजन यांची हवेत असलेली मात्रा या गुणवत्ता  केंद्रावर दर्शविली जाते. त्यामुळे हवेतील वायूंचे प्रमाण मर्यादित आहे की त्याने मर्यादा ओलांडले आहे, याची  माहिती नागरिकांना होत असते.  बंद केंद्राच्या देखभाल दुरुस्ती करिता तीन वेळा निविदा काढण्यात आल्या मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. शहरात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे.सायंकाळी कधी कधी धुके ही पडतात असे वाटते, मात्र काही एमआयडीसीतील औद्योगिक कंपन्या थंडीच्या काळात रसायनयुक्त वायूचे उत्सर्जन करतात. त्यामुळे शहरात कधीकधी धुके पडल्याचे भास होतात, प्रत्यक्षात मात्र धुके नसून ही रसायनमिश्रित हवा असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.  गेल्या वर्षी असाच प्रकार पाहण्यास मिळाला होता. सायंकाळी सातनंतर शहरातील कोपरखैरणे ते ऐरोली रेल्वे स्थानक परिसरात धुरके पसरले होते. प्रत्यक्षात वातावरणात धुलिकण पसरले होते. काही ठिकाणी दरुगधीयुक्त हवेच्या तक्रारीही नोंदवल्या गेल्या होत्या.

हवा गुणवत्ता निर्देशांकवर परिणाम?

महापालिकेच्या वतीने वार्षिक पर्यावरण अहवाल जाहीर केला जातो.यामध्ये शहरातील प्रत्येक गटातील प्रदूषण पातळी नोंदी करण्यात येतात. २०१९च्या पर्यावरण अहवालात तुर्भे येथील हवेची गुणवत्ता नोंद करण्यात आली नव्हती. त्यामुळे अहवालात त्या भागातील हवा प्रदूषणाच्या अचूक नोंदी नव्हत्या. तसेच यंदा तर तीन गुणवत्ता केंद्र उपलब्ध नाहीत.सध्या पालिकेचे फक्त ऐरोलीतील हवा गुणवत्ता केंद्र सुरू असून कोपरखैरणे, तुर्भेतील केंद्र बंद आहे तर वाशीतील अग्निशमन इमारत बांधकाम सुरू असल्याने काढण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षीच्या पर्यावरण अहवालात शहराच्या हेवेची अचूक माहिती उपलब्ध होईल का असा सवाल उपस्थित होत आहे.

कोपेरखैरणे तीन टाकीजवळील तसेच तुर्भे येथील हवा गुणवत्ता केंद्र दुरुस्तीसाठी  पालिकेच्या वतीने निविदा प्रक्रिया राबवली होती,मात्र या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने दुरुस्तीचे काम रखडले आहे.

-अनिल नेरपागर, कार्यकारी अभियंता पालिका