राज्यात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नसताना नवी मुंबईतील सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींतील छत कोसळू लागले आहेत. नेरुळ, सेक्टर २४ येथील सिडकोने बांधलेल्या स्वागत या गृहनिर्माण सोसायटीतील सतीश शेट्टी यांच्या घरातील छत सोमवारी कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यानिमित्ताने नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नवी मुंबईतील सिडको निर्मित धोकादायक इमारतींच्या प्रश्न गेली अनेक वर्षे चर्चिला गेला आहे. या इमारतींचा पुनर्विकास व्हावा यासाठी शासनाने अडीच एफएसआय जाहीर केला आहे, पण हा एफएसआय मिळावा म्हणून १८ गृहनिर्माण संस्थांनी प्रस्ताव सादर करूनही पालिकेने एकाही संस्थेला पुनर्विकासाची परवानगी दिलेली नाही. याच काळात पालिकेने २६७ इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे.
पावसाळ्यात या धोकादायक इमारतींत राहण्याचा धोका वाढला आहे. त्यात यंदा होणारा पाऊस जास्त असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे सिडको निर्मित इमारतीत राहणारे रहिवासी भयभीत झालेले आहेत. गेली अनेक वर्षे हे रहिवासी जीव मुठीत घेऊन दिवस काढत आहेत. त्यात सोमवारी सकाळी नेरुळ, सेक्टर २४ मधील स्वागत सोसायटीत तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या शेट्टी यांच्या घरात ही छत कोसळण्याची घटना घडली. वाशीतील अनेक घरांत रात्रीच्या वेळी झोपेत छत कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे धोकादायक अथवा निकृष्ट इमारतींच्या पुनर्विकासासाठी पालिकेने पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.