नवी मुंबई : परदेशातून आयात वाढल्याने घाऊक बाजारात कांद्याचे दर स्थिर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईतील एपीएमसीच्या घाऊक बाजारात मंगळवारी पाच हजार ८४४ क्विंटल कांदा आयात झाल्याने दर साठ रुपयेपर्यंत मर्यादित राहिले आहेत. किरकोळ बाजारात हा कांदा मात्र भाव खाऊन जात असल्याचे दिसून आले आहे.

देशातील कांद्याचे उत्पादन घटल्याने केंद्र सरकारने महिन्याभरापूर्वी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असून शेजारील देशांतून आयात सुरू केली आहे. राज्यात कांदा उत्पादन करणाऱ्या जिल्ह्य़ात यावेळी पडलेल्या मुसळधार पावसाने कांदा साठय़ावर पाणी फेरले आहे. त्यामुळे अर्धा अधिक कांदा चाळीतच खराब झाला असून पावसाळ्यात लावण्यात आलेली रोपे अतिवृष्टीमुळे वाहून गेली आहेत. त्यामुळे राज्यासह देशातील कांदा उत्पादन कमी झाल्याने कांद्याचे भाव वाढलेले आहेत. दिल्लीनंतर राज्यात कांद्याने शंभरी गाठण्याच्या स्थितीत असून सध्या ५० ते ७० रुपये प्रति किलो कांदा घाऊक बाजारात विकला जात आहे. कांद्याचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने इराक, अफगाणिस्तान यासारख्या देशांतून कांदा आयात करण्यास परवानगी दिली असून हा कांदा आता घाऊक बाजारात येऊ लागला आहे. त्यामुळे कांद्याचे दिवाळीपर्यंत दर स्थिर होतील असा आशावाद व्यापारी व्यक्त करीत आहेत. कांदाच्या आयात आणखी वाढल्यास कांदा घाऊक बाजारात ४० ते ५० रुपयापर्यंत मिळू शकणार असून दहा ते वीस रुपयांपर्यंत भाव कमी होऊ शकतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.