जेएनपीटी बंदरातून आखाती देशामार्गे चीनला रक्तचंदनाची तस्करी होत असून तस्करीच्या घटनांत मागील काही वर्षांपासून त्यात वाढ झाली आहे. यापूर्वी झालेल्या तस्करीत राज्याबाहेरील तस्करांचा हात असल्याचे उघड झाले होते. यावेळी मात्र तस्करीसाठी आलेला रक्तचंदनाचा कंटेनर स्थानिकांच्या मदतीने गोदामातून गायब करून त्या जागी बनावट कंटेनर ठेवण्यात आल्याच्या घटनेचा उरण पोलिसांनी तपास केला. या प्रकरणात उरणमधील स्थानिकांसह एकूण २१ जण आणि एका पोलिसालाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक कोटी सहा लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. प्रकरणातील चार प्रमुख आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. तसेच आणखी काही पोलीस व अधिकारीही जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. जेएनपीटी बंदरातील चंदन तस्करीतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. डिसेंबर २०१५ ला जेएनपीटीच्या सीमा शुल्क विभागाने रक्तचंदन असलेला कंटेनर द्रोणागिरी नोडमधील पंजाब कॉनवेअर या गोदामात थांबवून ठेवला होता. हा कंटेनर गोदामातून चोरीला गेल्याची तक्रार उरण पोलिसांत नोंदविण्यात आली होती. याचा तपास उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्या सूचनेनुसार करीत असताना पोलिसांना रक्तचंदनाने भरलेल्या कंटेनरऐवजी तसाच दिसणारा कंटेनर ठेवण्यात आला होता. या कंटेनरमध्ये त्या वजनाचे दगड भरले होते. हा रक्तचंदनाने भरलेला कंटेनर चोरी करण्यासाठी पंजाब कॉनवेअर गोदामातील साहाय्यक व्यवस्थापक आणि कलमार ऑपरेटर तसेच सीमा शुल्क विभागाला मदत करणाऱ्या एजंटने मदत केली. त्यानंतर हा कंटेनर रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्यांना विकण्यात आला. त्यासाठी दीपक पाटील, संतोष पाटील, प्रीतेश मुकादम व यापूर्वी रक्तचंदनाच्यात तस्करीत सापडलेल्या सुमित वाणी यांनी कंटेनरमधील मालाचा विक्री करून पैशांचे वाटप केले. यात चेतन कडू, सागर म्हात्रे, राजेंद्र कडू आणि मनोज भोईर यांनाही अटक केली आहे, तर चौकशीच्या वेळी दीड वर्षांपूर्वी बंदरात तस्करीसाठी येणाऱ्या कंटेनरची माहिती मिळताच पनवेलमधील पोलीस बाबरे याने कंटेनर वाटेतच अडवून चालकाला बाहेर काढून त्यातील माल दुसऱ्या ठिकाणी रिकामा करून चंदनाचे काही ओंडके कंटेनरमध्ये ठेवून चालकावर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पोलिसालाही अटक करण्यात आलेली आहे. हा कंटेनर दुबईत थांबविण्यात आल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर उरण पोलिसांनी कंटेनर परत आणण्यासाठी सीमाशुल्क विभागाला पत्र दिल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली. तस्करीसाठी बनावट एजन्सी, कंपनी तयार करून पदेशात माल नेण्याची सीमाशुल्क विभागाकडून परवानगी घेऊन एखाद्या मालाच्या नावाने रक्तचंदनाचा कंटेनर भरून तो दुबईमार्गे चीनमध्ये नेला जातो. रक्तचंदनाला चीनमध्ये सर्वाधिक मागणी आहे. रक्तचंदनापासून महागडी वाद्ये, विविध प्रकारची औषधे तसेच शोभेच्या वस्तू बनविल्या जातात.