घारापुरी बेटावर स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी शिवडी येथून वीज पोहचविली होती. परंतु स्वातंत्र्य मिळाले तेथील वीज गायब झाली. गेल्या ७० वर्षांत घारापुरी बेटावर विजेचा पुरवठा करण्यासाठी राबविल्या योजना यशस्वी झाल्या नाहीत. आता सबमरिन केबलद्वारे बेटावर कायमस्वरूपी वीजपुरवठा सुरू झाला आहे. घारापुरीतील अंधार दूर झाला आहे.

घारापुरीचा वीजपुरवठा हा न सुटणारा प्रश्न अखेर तडीस लागला आहे. गेली कित्येक वर्षे पर्यटन विभाग बेटावरील रहिवाशांसाठी जनरेटरच्या माध्यमातून दोन तासांपुरती विजेची व्यवस्था करत होता. मात्र त्यातील अनियमिततेमुळे रहिवाशांच्या नाकी नऊ येत होते. अखेर ऊर्जामंत्र्यानी न्हावा येथून सबमरिन केबलद्वारे महावितरणकडून कायमस्वरूपी विजेची योजना आखली. ही योजना तडीस नेतानाही अनेक अडथळे निर्माण झाले, परंतु आता सर्व अडथळे ओलांडत वीज बेटांवर पोहोचली आहे. महाशिवरात्र हा या बेटावरील एक महत्त्वाचा उत्सव. यंदाच्या महाशिवरात्रीपासून संपूर्ण गावाला वीजपुरवठा सुरू होणार आहे. घारापुरी बेट अखेर कायमस्वरूपी विजेने उजाळून निघणार आहे. रहिवाशांत याविषयी समाधान व्यक्त होत आहे.

घारापुरी बेटावर पाषण युगातील प्रसिद्ध शिवलेणी आहेत. या लेण्यांना युनेस्कोने जागतिक ठेव्याचा दर्जा दिला असून संरक्षित ठिकाण म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे या लेण्यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. घारापुरी (एलिफंटा) लेणी पाहण्यासाठी देशविदेशांतील लाखो पर्यटक दरवर्षी येतात. त्यामुळे येथील शेतबंदर, मोरा बंदर व राज बंदर या तीन गावांतील एक हजारापेक्षा अधिक रहिवाशांना रोजगार मिळतो. पर्यटन हेच येथील रहिवाशांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे.

गेल्या ७० वर्षांपासून घारापुरी बेटावर विजेची व्यवस्था नसल्याने येथील मुलांच्या शिक्षणात अडथळे येत होते.  येथील अनेक मूळ रहिवासी विजेअभावी उरणमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यामुळे त्यांचा काही प्रमाणात विकास झाला आहे. घारापुरी बेटावर कायमस्वरूपी वीजपुरवठा व्हावा यासाठी येथील रहिवासी आणि ग्रामपंचायतीने राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. राज्य सरकारनेही अनेक अडथळे दूर करत न्हावा येथून वीजपुरवठा करण्याची योजना पूर्ण केली.

उद्घाटनाची प्रतीक्षा

घारापुरी बेटावर वीजपुरवठा सुरू होऊन वीज घरोघरी पोहचली असली तरी ही योजना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे संकेत ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे या योजनेचे उद्घाटन कधी होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

विकासातील अडथळा दूर

* घारापुरी बेटावर कायमस्वरूपी वीजपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे या बेटावरील रहिवाशांचे आयुष्य सुकर होणार आहे. विजेअभावी गेल्या सात दशकांपासून रखडलेल्या विकासालाही गती मिळणार आहे.

* विजेमुळे पर्यटकांना बेटावर राहता यावे यासाठी हॉटेलची उभारणी केली जाऊ शकेल. येथील नागरिकांचा व्यवसाय वाढणार आहे. तसेच बेटावरील नागरिकांच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे.

* बेटावर जास्तीत जास्त पर्यटक यावेत यासाठी शिवडी ते घारापुरी रोप वे, बेटाजवळून जाणाऱ्या न्हावा-शेवा शिवडी सागरी सेतूमुळेही फायदा होणार आह. वीज नसल्यामुळे जे रहिवासी घारापुरी बेट सोडून इतरत्र गेले आहेत ते आपल्या गावी परत येतील.