उरण तालुक्यातील टाकी भोम आणि गावठाण दरम्यानच्या जलवाहिनीत नऊ फुटांचा एक अजगर आढळून आला होता. या अजगराला पकडण्यासाठी गेलेल्या सर्प मित्राने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याची कातडी हातात येत होती. तो आजारी असल्याचे लक्षात येताच त्याच्यावर उपचार करण्यासाठी सर्प मित्रांनी प्रयत्न सुरू केले.त्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला. मात्र या अजगरावर वेळेत उपचार होऊ न शकल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे उरण परिसरात वन्यजीवांवर उपचार करण्यासाठी एका केंद्राची सोय करण्याची मागणी सर्प मित्रांकडून केली जात आहे.
उरण तालुक्यातील खेडय़ापाडय़ांत तसेच शहरात सध्या मोठय़ा प्रमाणात वन्यजीवांचा वावर आहे. यामध्ये विषारी व बिनविषारी सापांची संख्या अधिक आहे.फ्रेन्डस ऑफ नेचर या वन्यजीव व निसर्ग वाचविण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेने लोकांमध्ये जागृती निर्माण केली आहे. सापांना मारू नका ते आपले मित्र आहेत. निसर्गाच्या संवर्धनात त्यांचाही वाटा आहे. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे साप दिसल्यास आम्हाला कळवा आम्ही येऊन साप घेऊन जाऊ. या जनजागरणामुळे रात्री-अपरात्री साप पकडण्यासाठी सर्प मित्रांना बोलावले जाते. यासाठी सर्प मित्रही जीव धोक्यात घालून सापांना वाचवितात व त्यांना पुन्हा एकदा जंगलात सोडून देतात. साप जखमी झाला असेल तर त्याच्यावर उपचार करतात. अशाच या अजगराची माहिती मिळताच जयवंत ठाकूर,अनुज आणि समीर म्हात्रे यांनी जाऊन अजगर पकडला. मात्र त्याला आजार झाल्याने त्याची कातडी निखळू लागली होती. अजगर ज्या जलवाहिनीत आढळला ती जलवाहिनी अनेक वर्षांची असल्याने या जलवाहिनीत रासायनिक पदार्थ असल्याचा संशय जयवंत ठाकूर यांनी व्यक्त केला होता.अशा आजारी सापांवर उपचार करावयाचा झाल्यास त्यांना पुण्यातील सर्पउद्यानात उपाचारांसाठी न्यावे लागते.त्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असते. याचा विचार करून उरणच्या वन विभागाचे अधिकारी चंद्रकांत मराडे यांच्याशी संपर्क साधून तातडीने उपचार करण्याची विनंती करण्यात आली होती.याची तयारी म्हणून वाहन,खर्चाचे पैसे व वन संरक्षक यांची व्यवस्था वन विभागाने केली होती. दरम्यान अजगरावर वेळेत उपचार न झाल्याने अजगर दगावला. असे असले तरी अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी उरण परिसरात वन्यजीवांवर उपचार करण्यासाठी केंद्र उभारण्याची मागणी वन्यजीव संरक्षण संस्थांनी केली आहे.