सागर दर्शन टॉवर, नेरुळ, सेक्टर- १८ अ

‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’लगतचा ‘सागर दर्शन टॉवर’ निसर्गरम्य परिसरात वसला आहे. या संकुलात भावी पिढय़ांवर निसर्गाचे संस्कार केले जातात. निसर्गाचा मान राखण्याचा आणि निसर्गाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न ‘सागर दर्शन’मधील रहिवासी करतात.

नेरुळ सेक्टर- १८ अ, येथील पामबीच मार्गावरील ‘सागर दर्शन’ संकुलाने सुरुवातीपासूनच हिरवळीचा ध्यास घेतला. ज्वेल ऑफ नवी मुंबईचे नैसर्गिक सौंदर्य या संकुलाच्या देखणेपणात अधिकच भर घालते. संकुलात विशेष करून हंगामी फुलांच्या झाडांची संख्या जास्त आहे. येथील रहिवासी स्वत: वृक्ष-रोपांची लागवड करतात. यात फुलझाडे, पाम, झोरास, मिनिटागास, नारळ या वृक्षांचा समावेश आहे. नवी मुंबई पालिकेच्या वतीने दर वर्षी दिला जाणारा उत्तम उद्यानासाठीचा पुरस्कार ‘सागर’ सलग चार वर्षे पटकावला आहे.

संकुलाला सणांची परंपरा आहे. निसर्गाच्या साथीनेच हे सण साजरे केले जातात. मुलांमध्ये निसर्गाविषयी ओढ निर्माण करण्यासाठी वेळोवेळी स्नेहसंमेलने साजरी केली जातात. त्यात विविध वृक्षांविषयी माहिती दिली जाते. उद्यानातील कोणतेही झाड तोडण्याचा अधिकार कोणालाही नाही. फुले ही तर निसर्गातच अधिक शोभून दिसतात, अशी शिकवण दिली जाते. तशा आशयाचे अनेक फलक संकुलात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

प्रत्येक रहिवाशी छोटय़ापासून ते मोठय़ांपर्यंत सर्वाना सर्व प्रकाराच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. टेबल टेनिस, लॉन टेनिस, व्यायामशाळआ, जलतरण या खेळांबरोबरच नृत्य, चित्रकलेसाठी मुलांना प्रोत्साहन दिले जाते. संकुलातील नऊ इमारतींमध्ये एकून २५० सदनिका आहेत. संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. इमारतींना अग्निसुरक्षा साधनांनी सज्ज ठेवण्यात आले आहे. याविषयीचे प्रशिक्षण येथील नागरिकांना नेहमी दिले जाते.

पार्किंग ही येथील समस्या आता उरलेली नाही. वाटून दिलेल्या जागांवर रहिवाशांची वाहने उभी केली जातात. संकुलातील रहिवाशी सामाजिक जबाबदारी म्हणून अनेक संस्थांना मदत पुरवतात. यासाठी पैशांऐवजी संस्थांना वस्तूंची पूर्तता करते.

पर्यावरणपूरक धोरण

संकुलात हिरवाईचा सहवास वाढवून निसर्गमय वातावरण निर्माण करण्यास सदस्य यशस्वी झाले आहेत. ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. याशिवाय सेंद्रिय खतनिर्मिती, अधिकाधिक सौरऊर्जेचा वापर तसेच पर्जन्य जलसंधारणाचेही नियोजन केले जाते.