व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांचे गौरवोद्वगार; अधिकारी-कर्मचारी भारावले
प्रशासकीय कारकीर्दीत मी अनेकदा निरोप सभारंभांना उपस्थित राहण्याचा प्रसंग आला, मात्र सर्व प्रथा, पद्धतींना फाटा देऊन आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच निरोप सभारंभ आहे. हा केवळ आपुलकीचा सभारंभ आहे. मुख्यमंत्री, प्रधान सचिव यांच्याकडे प्रत्येक वेळी आपली भूमिका प्रभावीपणे व अभ्यासपूर्वक मांडणारे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सिडकोला एक मानवी चेहरा मिळवून देण्याचे कार्य मागील तीन वर्षांत केले आहे, असे गौरवोद्गार सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी भाटिया यांच्या निरोप समारंभात काढले. भाटिया या निरोप समारंभाला उत्तर देताना काहीसे भावुक झाले होते.
केंद्र सरकारच्या मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये अध्यक्ष म्हणून बदली झाल्यानंतरही आठ दिवसांनी भाटिया यांना सिडकोत पुन्हा आमंत्रित करून सोमवारी निरोप देण्यात आला. या वेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक गगराणी, सहव्यवस्थापकीय संचालक व्ही. राधा, राजेंद्र चव्हाण, मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे, कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश तांडेल यांच्यासह सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. सिडकोला मानवी चेहरा देण्याचे जाणीवपूर्वक काम करताना भाटिया यांनी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रभाव टाकला असल्याचे दिसून येत आहे, असे गगराणी यांनी सांगितले. अनेक सनदी अधिकारी शासकीय संस्थांमध्ये येतात आणि जातात तो एक प्रशासकीय सेवेचा भाग आहे; पण एक कायमस्वरूपी पद्धती तयार करण्याचे उत्तम कार्य भाटिया यांनी केले. हे काम भावी वाटचालीसाठी मला आणि राज्याला फायदेशीर ठरणार असल्याचे गगराणी म्हणाले.
या वेळी सिडको व कामगार संघटनेच्या वतीने भाटिया यांना भेटवस्तू व प्रशस्तिपत्र देण्यात आले. आपल्या कारकीर्दीत कोणत्याही प्रकारची भेटवस्तू न स्वीकारणाऱ्या व कोणालाही घेऊ न देणाऱ्या भाटिया यांनी या वेळी आमची आठवण म्हणून भेटवस्तू स्वीकाराव्या अशी मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी विनंती केल्यानंतर भाटिया यांनी त्या वस्तू स्वीकारल्या.
भाटिया पहिले अधिकारी
सिडकोत आतापर्यंत २४ पेक्षा जास्त व्यवस्थापकीय संचालक होऊन गेले, मात्र बदली झाल्यानंतर त्यांना पुन्हा बोलावून निरोप समारंभ आयोजित करण्याचा हा भाटिया यांच्याबाबतीत घडलेला पहिलाच प्रसंग आहे. कामगार संघटनेबरोबर वितुष्ट येत असल्याने कोणत्याच अधिकाऱ्याचा इतक्या मोठय़ा प्रमाणात निरोप सभारंभ करण्यात येत नव्हता. मात्र भाटिया यांच्या निरोपासाठी झाडून सिडको अधिकारी, कर्मचारी उपस्थित असल्याने सभागृह खचाखच भरले होते. त्या वेळी काही अधिकाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.

बीपीटीत एकाकी वाटते
भाटिया यांनी निरोप समारंभाला उत्तर देताना भाषणबाजी न करता एक प्रकारे कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्या वेळी प्रत्येक अधिकाऱ्याने केलेले काम आणि त्याचा वकूब नावानिशी सांगून सर्वाचे आभार मानले. काही अधिकाऱ्यांची या वेळी तोंडभरून स्तुतीही केली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रकल्पांमुळे सिडको आता एका उंचीवर येऊन ठेपली आहे. तिला अधिक उंचीवर नेण्याचे काम अधिकारी कर्मचाऱ्यांचे आहे. बीपीटीत मला एकाकी वाटत असून तुमची सर्वाची खूप आठवण येते, असे भाटिया यांनी सांगताच सभागृहात काही काळ स्तब्धता पसरली. गगराणी एक डायनॅमिक अधिकारी असल्याचे प्रशस्तिपत्रदेखील भाटिया यांनी दिले.