पं. बिरजू महाराज यांच्या उपस्थितीत वाशीत सोहळा
श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवून रचण्यात आलेल्या विविध नृत्याविष्कारांचा समावेश असलेल्या ‘शेड्स ऑफ लव्ह’ या कार्यक्रमाचे येत्या २९ जानेवारी रोजी वाशीत आयोजन करण्यात आले आहे. ‘आदिशक्ती संगीत कला केंद्र’ या संस्थेतील ४०० विद्यार्थी या कार्यक्रमात नृत्य सादर करणार असून पद्मविभूषण कथ्थक गुरू पं. बिरजू महाराज यांची या कार्यक्रमास उपस्थिती असणार आहे.
वाशीतील सिडको सभागृहात २९ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास पं. बिरजू महाराज यांच्यासह प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना साश्वती सेन आणि पाश्र्वगायक मोहम्मद अझीझ हे उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्याचे धडे देत गेल्या दहा वर्षांपासून नवी मुंबईत कार्यरत असलेल्या आदिशक्ती संगीत कला केंद्राच्या तीन संस्थांमधील ४०० विद्यार्थी या वार्षिक कला विहार उत्सवात सहभागी होणार आहेत.
श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखेभोवती हे विद्यार्थी नृत्य सादर करणार आहेत. त्यासाठी हे विद्यार्थी गेल्या दोन महिन्यांपासून सराव करत असल्याची माहिती कला केंद्राचे अतीत कुमार पांडे यांनी दिली. प्रेक्षकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ९९६७९६९३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.