दिघा येथील ९४ अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला सणासुदीच्या दिवसांमुळे स्थगिती देण्यात आली होती. या कारवाईला १ डिसेंबरपासून नव्याने सुरुवात होणार होती, मात्र पुरेसे पोलीस बळ नसल्याने ही कारवाई थांबवण्यात आली. गणपती पाडा येथील अंबिका इमारतीवर हातोडा पडणार होता, मात्र या इमारतीमधील रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतल्याने ही कारवाई तूर्तास थांबवण्यात आली आहे.
एमआयडीसीच्या भूखंडांवरील ९० व सिडकोच्या भूखंडांवरील ४ बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यानुसार एमआयडीसीने आतापर्यंत केरू प्लाझा, पार्वती, शिवराम या तीन निवासी इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. १ डिसेंबरपासून या कारवाईला पुन्हा सुरुवात होणार होती, मात्र ऐरोलीमध्ये सुरू असलेल्या सिडकोच्या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त वळवण्यात आल्याने एमआयडीसीकडून ही कारवाई थांबवण्यात आली. गणपती पाडा येथील अंबिका इमारतीवर ७ नोव्हेंबरला कारवाई होणार होती. मात्र तेथील रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना ३१ डिसेंबपर्यंत घरे रिकामी करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या इमारतीवरील कारवाई थांबवण्यात आली आहे. दिघ्यातील मोरेश्वर व भगत या इमारतींना ७ दिवसांत घरे रिकामी करण्याची नोटीस लावण्यात आल्याची माहिती, एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश माळी यांनी दिली.
२६ विकासकांवर एमआरटीपी दाखल
दिघ्यातील अनधिकृत बांधकामप्रकरणी आतापर्यंत २६ विकासकांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापकी ४ जण अटकेत असल्याचे रबाले एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम देशमुख यांनी सांगितले.