स्थायी समितीचे सदस्य परेश ठाकूर कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक

संतोष सावंत
पनवेल : पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नेते रामशेठ ठाकूर हे सल्लागार आणि त्यांची पत्नी संचालक असलेल्या कंपनीलाच महापालिका क्षेत्रातील एका रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे २४ कोटींचे काम देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाकूर यांचे पुत्र परेश हे सदस्य असलेल्या स्थायी समितीनेच या कंत्राटदाराच्या नेमणुकीच्या प्रस्तावास गेल्या आठवडय़ात मंजुरी दिली. विशेष म्हणजे, परेश ठाकूर हे स्वत: या कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक असून आजही कंपनीच्या संकेतस्थळावरील व्यवस्थापन यादीत त्यांचा उल्लेख आहे.

रोहिंजन येथे २४ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, गटार बांधणे आणि तलावावर पुलाचे बांधकाम करणे या कामांकरिता ‘ठाकूर इन्फ्रा’ या कंपनीला ठेका देण्यास स्थायी समितीने गेल्या गुरुवारी मंजुरी दिली. त्यावेळी चर्चेदरम्यान परेश ठाकूर यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याची नोंद करण्यात आली. मात्र, तरीही या प्रकरणात सारेच आलबेल नसल्याची चर्चा पालिकेतच दबक्या आवाजात सुरू आहे.

या सभेत ६५ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यामधील सर्वाधिक रकमेचे कंत्राट ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि. या कंपनीला बहाल करण्यात आले. विषयपत्रिका प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देण्यात आली नव्हती. तसेच ऑनलाइन बैठकीत निमंत्रण नव्हते. त्यामुळे बैठकीत नेमके काय घडले, हे गुलदस्त्यात आहे. परंतु परेश ठाकूर यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या कंपनीला २४ कोटींचे कंत्राट देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि. या कंपनीचे रामशेठ ठाकूर हे संस्थापक आणि विद्यमान सल्लागार आहेत. त्यांच्या पत्नी शकुंतला ठाकूर या कंपनीच्या संचालक आहेत. सध्या महापालिकेतील सभागृह नेते आणि स्थायी समिती सदस्य असलेले परेश ठाकूर हे या कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक असून कंपनीच्या संकेतस्थळावर आजही व्यवस्थापन यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी ठाकूर हेच सत्ताकेंद्र असल्याचे मानले जाते. असे असताना त्यांच्याशी संबंधित कंपनीलाच रोहिंजन येथील रस्त्याच्या कामासाठी २४ कोटी ५४ लाख रुपयांचे कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, ही मंजुरी देण्यात येत असताना स्थायी समितीतील विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही मौन धारण केल्याचे समजते.

बैठकीत तटस्थ

महापालिका अधिनियमानुसार, पालिका सदस्याचा किंवा आपल्या भागीदारांमार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या हितसंबंध असेल अशा कोणत्याही बाबीसंबंधी चर्चा सुरू असताना त्यावेळी मत देऊन किंवा त्यात सहभागी होऊन किंवा यासंदर्भात कोणताही प्रश्न विचारून महापालिकेचा सदस्य या नात्याने काम करेल तर, त्याचे पालिका सदस्य म्हणून पद धारण करणे बंद होईल. याच नियमाचे पालन करून परेश ठाकूर यांनी स्थायी समितीच्या चर्चेत तटस्थ भूमिका घेतल्याची नोंद आहे.

६५ कोटींच्या कामांना मंजुरी

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ४६ विषय मांडण्यात आले. त्यापैकी ४४ विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये मलनिस्सारण वाहिन्या, अंतर्गत गटारे, मासळी बाजार, रस्ते काँक्रीटीकरण, डांबरीकरण अशा स्वरूपांच्या जवळपास ६५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली.

मी मे. ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. माझी आई या कंपनीची संचालक आहे. त्यामुळे ज्यावेळी या कंपनीने भरलेल्या निविदा प्रक्रियेवर चर्चा करण्याचा विषय स्थायी समितीमध्ये आला तेव्हा मी तटस्थ असल्याची नोंद स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे. ठाकूर इन्फ्रा कंपनीमध्ये अशा प्रकारच्या कामाच्या निर्णय प्रक्रियेत मी स्वत: भाग घेतलेला नाही.

– परेश ठाकूर, स्थायी समिती सदस्य