उरण सामाजिक संस्थेचा पुढाकार

उरणमध्ये गेल्या दहा वर्षांत ८०० पेक्षा अधिक रस्ते अपघात झाले असून या अपघातांत ८० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. जेएनपीटी बंदरासह दोन खाजगी बंदरांमुळे अवजड वाहनांची ये-जा वाढल्याने हे अपघात होत आहेत. या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली आहे. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारपासून करळ फाटा येथे उरण सामाजिक संस्थेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

औद्योगिकीकरण होत असताना वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी जेएनपीटी, सिडको, राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणावर आहे. जेएनपीटी बंदराची पंचवीस वर्षांपूर्वी उभारणी करण्यात आली त्या वेळी बंदरातील कंटेनर हाताळण्याची क्षमता वार्षिक एक लाख होती. ती सध्या ४५ लाखांवर पोहोचली आहे. २०१९ पर्यंत ती १ कोटीवर पोहोचणे अपेक्षित आहे. बंदरातील मालाची ने-आण करण्यासाठीचे हजारो कंटेनर रस्त्यावरच उभे केले जातात. या कंटेनर चालकांच्या बेदरकारपणाचा फटका लहान गाडय़ा व दुचाकींना बसत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी उरण सामाजिक संस्थेने गेली दहा वर्षे जेएनपीटी प्रशासन, राज्य व केंद्र सरकार यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या आदेशाने उपाययोजना लागू करण्याचा निर्णय झाला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

रस्त्याचे रुंदीकरण करण्यापूर्वी उरण-पनवेल मार्गावरील प्रवाशांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याच्या मागणीवर या धरणे आंदोलनात भर देण्यात येणार आहे.