नवरात्रोत्सवानिमित्त सीबीडी येथील अर्बन हाटमध्ये नवरात्र मेळावा सुरू झाला आहे. हस्तकला व बचत गटांकडून करण्यात येणाऱ्या वस्तूंना वाव मिळावा तसेच या उत्सवामध्ये लागणाऱ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रात बसवण्यात येणारे घट, त्याच्या सजावटीसाठीचे सामान तसेच गरब्यासाठीची वेषभूषा येथे उपलब्ध असून ग्रामीण कलाकारांनी हस्तकलेच्या माध्यमातून बनवलेल्या या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे.
या मेळ्यामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यांतील कलाकारांनी घडवलेल्या कलाकृती, शिल्पकृती, हातमाग, हस्तकलेच्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत. महिलांसाठी हातमागावरील साडय़ा, पंजाबी ड्रेस, कुडता, पायजमा हेदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत, तसेच नवरात्रीसाठीची खास घागरा-चोलीदेखील विक्रीस आहे. याशिवाय कृत्रिम दागिने, सजावटीचे दिवे तसेच टाकाऊ वस्तूंपासून केलेल्या शोभेच्या वस्तू उपलब्ध आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओदिशा, आंध्र प्रदेश, झारखंड, बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, बंगाल आदी राज्यांतील कलाकार व कारागिरांच्या कलाकृतीचा यात समावेश आहे.
या मेळाव्यानिमित्त ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत फिल्म डिव्हिजन मुंबई आणि अर्बन हाट यांच्यातर्फे फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. तर डी. वाय. पाटील हॉटेल
मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटतर्फे खवय्यांसाठी विशेष कक्ष उभारण्यात येणार आहेत. १७ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत नामांकित आचाऱ्यांनी तयार केलेल्या वैविध्यपूर्ण आणि खास खाद्यपदार्थाचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे.
अर्बन हाटच्या प्रेक्षागृहात २५ ऑक्टोबरला भरत नाटय़मचा कार्यक्रमही सादर होणार आहे.