उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायतीच्या करंजा परिसरासाठी सिडकोच्या हेटवणे जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आलेली असून ती वीजजोडणी नसल्याने सुरू झालेली नाही. त्यामुळे ही योजना तत्काळ सुरू करून करंजा पाणीपुरवठा योजना सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
करंजा गावातील नागरिकांना अनियमित व अशुद्ध पाणीपुरवठय़ामुळे होणाऱ्या आजारांचाही सामना करावा लागला आहे. याची दखल घेत उरणचे माजी आमदार विवेक पाटील यांनी करंजा गाव व परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोच्या हेटवणे धरणातील जलवाहिनीला जोडणी देण्याची मागणी केली होती. त्यासाठी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने ८२ लाख रुपये खर्च करून जलवाहिनीही टाकलेली आहे. या जलवाहिनीची चाचणीही घेण्यात आलेली आहे. मात्र पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या जोडणीसाठी ग्रामपंचायतीला ७ लाख रुपये खर्चाची अपेक्षा आहे. ही रक्कम ग्रामपंचायत खर्च करू शकत नसेल तर ग्रामस्थ व शेतकरी कामगार पक्ष रक्कम देण्यास तयार असल्याचे मत शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम नाखवा यांनी दिली आहे. तर या संदर्भात चाणजे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रदीप कोळी यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या योजनेला लागणारा निधी उपलब्ध करून योजना सुरू केली जाईल असे मत त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले. त्यामुळे करंजा परिसरासाठी असलेली हेटवणे पाणीपुरवठा योजना सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.