स्वयंसेवकांना सुरक्षा नाहीच

विसर्जनस्थळांवर महापालिकेतर्फे गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी स्वयंसेवक नेमण्यात येतात, मात्र त्यांच्या सुरक्षेबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप होत आहे. या काळात तासन्तास पाण्यात उतरावे लागते. त्यामुळे अनेक आजार होतात. यासाठी विमा संरक्षणाची मागणी या स्वयंसेवकांची आहे. मात्र या वर्षीही त्यांना हे संरक्षण मिळालेले नाही.

ऐरोली ते बेलापूपर्यंत २२ विसर्जनस्थळांवर ७५० पेक्षा अधिक स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येते. विसर्जन घाटांवर अत्याधुनिक यंत्रणादेखील उपलब्ध करून देण्यात येते, मात्र स्वयंसेवकांना गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. नाइलाजास्तव त्यांना खासगी रुग्णालयांत उपचार घ्यावे लागतात. या स्वयंसेवकांना मोबादला म्हणून अल्प मानधन दिले जाते, मात्र उपचारांबाबत दखल घेतली जात नाही. त्यामुळे विमा संरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे.

विसर्जनासाठी १० ते १८ तास पाण्यात राहावे लागते. यादरम्यान दुर्घटना होण्याचीही शक्यता असते. या कालावधीत सतत पाण्यात उभे राहावे लागत असल्याने काही दिवसांनी स्वयंसेवकांना त्याचा त्रास होण्यास सुरुवात होते. यामध्ये ताप येणे, न्यूमोनिया, अंगदुखी या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. यातून एखाद्याच्या जिवावर बेतले तर काय, असा सवाल या स्वयंसेवकांचा आहे.

याबाबत महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांना विचारले असता, विसर्जन करणाऱ्या स्वयंसेवकांना विमा सुरक्षा देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.